ब्राह्मण महासंघाने खडसेंच्या वक्तव्यावर घेतला आक्षेप; केली माफी मागण्याची मागणी


पुणे – ब्राह्मण समाजाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. एकनाथ खडसेंनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्रिपद मी ब्राह्मणाला दान केल्याचे म्हटले होते. पुण्यातील ब्राह्मण महासंघाने त्यावरून खडसेंच्या वक्तव्यावर आक्षेप घेत त्यांनी तातडीने माफी मागण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणावर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की, फडणवीसांवर टीका करताना एकनाथ खडसेंनी ब्राह्मण समाजाबाबत जे वक्तव्य केले त्यांनी ते मागे घ्यावे, अन्यथा खडसेंचा एकही कार्यक्रम पुण्यात होऊ देणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे पदवीधर निवडणुकीत त्यांच्या वक्तव्याचे परिणाम भोगावे लागतील.

त्याचबरोबर दान देण्यासाठी मुळात ती वस्तू आपल्या अधिकारात असायला हवी, एकनाथ खडसेंना हे ज्ञात नाही याचे आश्चर्य वाटते, आपले वक्तव्य एकनाथ खडसेंनी मागे घ्यावे, अन्यथा खडसेंना पुण्यात आल्यानंतर जाब विचारण्यात येईल. आनंद दवेंनी यासंदर्भात पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना निवेदनही दिले असल्यामुळे एकनाथ खडसेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे.

नाथाभाऊ हा दिलदार असून आता नाथाभाऊ तुम्ही घरी बसा, मला मुख्यमंत्री व्हायचे असल्याचे मला सांगितले गेले. त्यावर मी म्हटले भल्याभल्यांना मी दान देतो. मग एका ब्राह्मणाला दान द्यायला काय हरकत आहे. तेव्हा मुख्यमंत्रिपद मी ब्राह्मणाला दान केले, माझ्यासारख्यांना एका व्यक्तीच्या लाडापोटी बाजूला टाकण्यात आले. सरकारचे वाटोळे त्याच व्यक्तीमुळे झाले, मला भाजप अशा लोकांमुळेच सोडावे लागल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.