पंकजा मुंडेंना शिवसेनेत बोलवण्यासाठी उद्धव ठाकरेंना भेटणार सेना खासदार


मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना शिवसेना प्रवेशाची निमंत्रणे सुरुच असून पंकजांना सेनेत शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनीही आवताण दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हेमंत पाटलांसह शिवसेनेचे पदाधिकारी भेट घेऊन पंकजांना सेनेत बोलवण्यासाठी विनंती करणार आहेत.

भाजपमध्ये पंकजा मुंडे यांना मान मिळत नाही. शिवसेनेत पंकजा मुंडे आल्यास त्यांचे स्वागतच आहे. शिवसेनेत पंकजा मुंडे यांना आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी भेट घेणार आहोत. शिवसेनेमध्ये पंकजा मुंडे आल्यास मराठवाड्यातील शिवसेनेची ताकद वाढेल, असा विश्वास हेमंत पाटील यांनी व्यक्त केला. यासंदर्भातील वृत्त टीव्ही 9 मराठीने दिले आहे.

भाजपला रामराम करत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यापासून शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी पंकजा मुंडेंनाही निमंत्रण येत आहेत. शिवसेना प्रवक्ते आणि सार्वजनिक पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आतापर्यंत पंकजांना शिवसेना प्रवेशाचे आमंत्रण दिले आहे.