ड्रग्ज प्रकरणी एनसीबीची अर्जुन रामपालच्या घरावर धाड


मुंबई – अभिनेता अर्जुन रामपालच्या घरावर बॉलिवूड ड्रग्जप्रकरणी अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) धाड टाकली आहे. बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास करत असताना समोर आले आहे. आतापर्यंत अनेक दिग्गज अभिनेत्रींची नावे या प्रकरणामध्ये समोर आली आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची एनसीबीने चौकशीसुद्धा केली आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर या अभिनेत्रींच्या ड्रग्ज प्रकरणी चौकशीनंतर A, D, R आणि S ही अक्षरे त्यांच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये समोर आली होती. त्यानुसार, A म्हणजे अर्जुन रामपालच्या नावाची चर्चा होती. एनसीबीने याआधी अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सच्या भावाला ताब्यात घेतले आहे. त्याचे नाव ड्रग्जप्रकरणी समोर आल्याने अ‍अँगिसिलोस डेमेट्रियड्सला अटक करण्यात आल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान कालच बॉलिवूड निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्या घरातून एनसीबीच्या छाप्यांदरम्यान ड्रग्ज जप्त करण्यात आले. एनसीबीने फिरोज यांच्या घरी केलेल्या कारवाईअंतर्गत १० ग्रॅम गांजा, तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. एनसीबीने मुंबईत समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली पाच ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. यामध्ये मालाड, अंधेरी, लोखंडवाला, खारघर आणि कोपरखैराणे या भागांचा समावेश आहे.