८ वर्षांच्या तुरुंगवासादरम्यान मिळवल्या तब्बल ३१ पदव्या, बाहेर पडताच मिळाली सरकारी नोकरी


अहमदाबाद – एखाद्या व्यक्तीने जर मनाशी ठरवले की कठिण परिस्थितीसमोर गुडघे टेकले नाही, तर तो कोणतीही गोष्ट सहज साध्य करु शकतो. असेच काहीसे एका कैद्याने करून दाखवले आहे. कारागृहात गेल्यानंतर एखादी कैदी सराईत गुन्हेगार होतो किंवा त्याचे आयुष्य नैराश्यमय होते. पण हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच कैदी आपल्या आयुष्याला चांगल्या वळणावर नेतात.

असेच काहीसे एक दुर्मिळ उदाहरण गुजरातमधून समोर आले आहे. तुरुंगात राहून आठ वर्षांत दोन चार नव्हे तर तब्बल ३१ पदव्या गुजरातमधील भावनगर येथील भानूभाई पटेल यांनी मिळवल्या. त्यांच्या या कर्तृत्वामुळे तुरुंगातून बाहेर पडताच सरकारी नोकरी मिळवली. एवढ्यावरच भानूभाई न थांबता, त्यांनी नोकरी मिळाल्यानंतर पुढील पाच वर्षांत अजून २३ पदव्या मिळवल्यामुळे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, युनिव्हर्सल रेकॉर्ड फोरम आणि वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये भानूभाईंच्या नावाची नोंद झाली.

भावनगरमधील महुवा तालुक्यातील ५९ वर्षीय भानूभाई पटेल हे रहिवासी आहेत. एमबीबीएसची पदवी अहमदाबादमधील बीजे. मेडिकल कॉलेजमधून घेतल्यानंतर ते अमेरिकेत १९९२ मध्ये मेडिकलच्या पदवीसाठी गेले होते. तेथील त्यांचा एक मित्र विद्यार्थी व्हिजावर काम करून आपला पगार भानूभाईंच्या खात्यात ट्रान्सफर करत असे. त्यामुळे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन अ‍ॅक्टच्या उल्लंघनाचा त्यांच्यावर आरोप झाला होता. तसेच १० वर्षांची शिक्षा वयाच्या ५० व्या वर्षी झाल्यामुळे अहमदाबादमधील कारागृहात त्यांना १० वर्षांची शिक्षा भोगावी लागली. त्यांनी आठ वर्षांच्या याकाळात एकूण ३१ पदव्या मिळवल्या.

तुरुंगात गेलेल्या व्यक्तीला सर्वसाधारणपणे सरकारी नोकरी मिळत नाही. पण तुरुंगातून मुक्तता झाल्यानंतर आंबेडकर विद्यापीठाने भानूभाई यांना नोकरीची ऑफर दिली. त्यांनी या नोकरीदरम्यान ५ वर्षांत अजून २३ पदव्या मिळवल्या. अशाप्रकारे आतापर्यंत त्यांच्या नावावर एकूण ५४ पदव्यांची नोंद झाली आहे.दरम्यान, लॉकडाऊनच्या कालावधील आपले तुरुंगातील अनुभव आणि विश्वविक्रमापर्यंतच्या प्रवासावर आधारित तीन पुस्तके भानूभाई यांनी गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषेत लिहिली. गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रिसायडिंग ऑफिसर म्हणूनही भानूभाई यांनी काम केले आहे.