आपल्या 4 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल 20 हजारांहून अधिक वेळा खोटे बोलले डोनाल्ड ट्रम्प


वॉशिंग्टन – आपल्या चार वर्षांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकिर्दीत डोनाल्ड ट्रम्प हे तब्बल 20 हजारांहून अधिक वेळा खोटे बोलल्याची माहिती समोर आली असून याबाबतची माहिती फॅक्ट चेक वेबसाईट पॉलिटीफॅक्टने (PolitiFact) दिली आहे. या संर्दभात पॉलिटीफॅक्टने दिलेल्या माहितीनुसार, 2016 पासून आतापर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यांपैकी अनेक वक्तव्य ही खोटी आहेत. वॉशिंग्टन पोस्टच्या डेटाबेसनुसार, ट्रम्प यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या खोट्या वक्तव्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली आहे.

आपल्या कारकिर्दीत ट्रम्प यांनी जवळपास 407 वेळेस आपण अर्थव्यवस्था आणखी मजबूत केल्याचा दावा केला आहे. वास्तविक पाहता ट्रम्प यांच्यापेक्षा आयझनहावर, लिंडन बी जॉन्सन आणि बिल क्लिंटन यांच्या कारकिर्दीत अमेरिकेची आर्थिक व्यवस्था अधिक चांगली होती. त्याचबरोबर राष्ट्रवादी विचारांचा पुरस्कार करण्यासाठी ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळाच्या सुरुवातीपासूनच मेक्सिको सीमेवर होणारी बेकायदेशीर घुसखोरी रोखण्यासाठी मेक्सिको सीमेवर मोठी भिंत बांधण्याची घोषणा केली होती. भिंत बांधण्याचे काम लवकरच पूर्ण होणार असल्याचा दावा त्यांनी सातत्याने केला. काँक्रिटची एक भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. पण आधीपासून असलेल्या कुंपणाच्या भागाला वाढवण्यासाठी हे काम करण्यात आले आहे.

2016 मधील निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियासोबत संगनमत नसल्याचे सांगत आले आहेत. तर ट्रम्प यांना विजय मिळवून देण्यासाठी त्यांच्या रशियन सहकाऱ्यांनी हिलरी क्लिंटन यांना बदनाम करण्याचा कट आखला असल्याचे मूलर रिपोर्टमध्ये म्हटले होते.