भाजप नेत्याची तृणमूलच्या कार्यकर्त्यांना थेट स्मशानात पाठवण्याची धमकी


नवी दिल्ली – पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच तेथील राजकीय पक्षांनी कंबर कसण्यास सुरूवात केली आहे. पश्चिम बंगालकडे भाजपनेही आपला मोर्चा वळवला असून, ममता बॅनर्जी सरकारविरोधात आता भाजप अधिकच आक्रमक झाली आहे. असे असतानाच तृणमूलच्या कार्यकर्त्यांना थेट स्मशानात पाठवण्याचीच धमकी भाजप नेत्याने दिली आहे.

सध्या पश्चिम बंगालवर भाजपने लक्ष केंद्रीत केले असून भाजपने बंगालमध्ये मागील काही वर्षांपासून पक्ष विस्ताराचे काम हाती घेतले. मागील काही निवडणुकींमध्ये त्याचे काही परिणाम दिसूनही आले. पण यात आता भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होताना दिसत आहे. भाजप कार्यकर्त्यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. भाजपने याप्रकरणात तृणमूलवर आरोप केले होते.


दरम्यान, हल्दीयामध्ये झालेल्या एका सभेत भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना जिवे मारण्याचीच धमकी दिली. केंद्र सरकार पश्चिम बंगालमध्ये मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका होण्यासाठी काळजी घेईल. राज्य पोलीस नव्हे, तर केंद्रीय सुरक्षा व्यवस्था विधानसभा निवडणुकीत असेल, असे त्यांनी सांगितले.

ममता दीदीच्या कार्यकर्त्यांना मी सांगतो, वाईट गोष्टी जे करत आहेत. ६ महिन्यात स्वतःमध्ये त्यांनी बदल करावेत, नाहीतर त्यांचे हात, पाय आणि डोकी फुटतील. तुम्हाला घरी जाण्याआधी रुग्णालयात जावे लागेल. त्यांनी जर जास्त त्रास दिला, तर त्यांना थेट स्मशानभूमीतच पाठवले जाईल, असा इशारा देत घोष यांनी जिवे मारण्याची धमकी दिली. पुढील वर्षी पश्चिम बंगाल विधानसभेसाठी निवडणूक होत असून, आतापासूनच भाजपने तयारी सुरू केली आहे. या निवडणुका पुढील वर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.