अर्णब गोस्वामींच्या जीवाला धोका; गृहमंत्र्यांशी राज्यपालांनी बोलावे : राम कदम


नवी मुंबई: सध्या तळोजा कारागृहात असलेल्या रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या जीवाला धोका असून गृहमंत्री अनिल देशमुख यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फोन करावा. अशाप्रकारे राज्याच्या गृहमंत्र्यांना राज्यपालांना फोन करावा लागतो, हा महाराष्ट्र सरकारचा नाकर्तेपणा असल्याची टीका भाजप आमदार राम कदम यांनी केली.

गेल्या काही दिवसांत राम कदम यांनी अर्णब गोस्वामी यांच्या सुटकेसाठी उपोषणापासून ते पदयात्रा असे सर्व उपाय करुन पाहिले आहेत. आज अखेर राम कदम नवी मुंबईच्या तळोजा येथील कारागृहात अर्णब गोस्वामी यांची भेट घेण्यासाठी गेले असता, त्यांना ही भेट नाकारण्यात आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी राम कदम यांनी संवाद साधला.


तळोजा तुरुंगात कारागृह अधीक्षकांची मी भेट घेतली. तुरुंगात अर्णब गोस्वामी यांना योग्यप्रकारे वागणूक देण्यात यावी. कायदा हातात घेतला जाणार नाही किंवा कुठल्याही प्रकारे मानवाधिकारांचे उल्लंघन होता कामा नये, असे मी तुरुंग प्रशासनाला सांगितले. अर्णब गोस्वामी यांच्या केसालाही धक्का लागला तर जनता त्यांच्या पाठिशी आहे. हे सरकार पत्रकारांचा गळा दाबू शकत नाही. मला अर्णब गोस्वामी यांना हे सरकार भेटून देत नाही तर मग सामान्य जनतेचे काय, असा सवाल यावेळी राम कदम यांनी उपस्थित केला.

भाजप नेते अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यापासून त्यांना जामीन देण्याची सातत्याने मागणी करत आहेत. रविवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेटही घेतल्यानंतर आज लगेचच राज्यपालांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चाही केली. अर्णब गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत त्यावेळी राज्यपालांनी चिंता व्यक्त केली. अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटून दिले जावे, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय, अर्णब गोस्वामी यांच्या घरात ज्याप्रकारे पोलिसांचा फौजफाटा शिरला आणि त्यांना अटक करण्यात आली, याविषयीही राज्यपालांनी गृहमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते.