अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणाचा क्लोझर रिपोर्ट सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांची होणार चौकशी


मुंबई – उच्च न्यायालयात काही दिवसांपूर्वीच झालेल्या सुनावणीवेळीही अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणाच्या तपासावर न्यायमूर्ती एम.एम. शिंदे यांनी ताशेरे ओढले होते. क्लोझर रिपोर्ट नाईक कुटुंबीयांना अंधारात ठेवून सादर करण्यात आल्याचे निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदवले होते. आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून या पार्श्वभूमीवर अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणाचा तपास थांबवण्याच्या निर्णयाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोणतेही पुरावे अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात मिळाले नसून याप्रकरणाची चौकशी थांबवण्यात यावी, असा न्यायालयात क्लोझर रिपोर्ट सादर करणाऱ्या तत्कालीन तपास अधिकारी अनिल पारसकर यांच्यावर याप्रकरणी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात तपास केलाच नसल्याचे मत गृहमंत्र्यांनी व्यक्त केल्यामुळे आता रायगडचे तत्कालीन पोलिस अधीक्षक अनिल पारसकर आणि सुरेश वराडे हे गोत्यात येण्याची शक्यता आहे. तर अनिल पारसकर यांच्यावर कारवाईची शक्यताही व्यक्त होत आहे. सुशांतची सुसाईड नोट नव्हती, पण माझ्या वडिलांच्या सुसाईड नोटमध्ये अर्णबचे नाव, तरीही कारवाई का नाही? सुशांतसिंह राजपूतची सुसाईड नोट नव्हती, पण अर्णब गोस्वामी यांचे माझ्या वडिलांच्या सुसाईड नोटमध्ये नाव आहे, तरी देखील कारवाई का केली गेली नाही? असा सवाल आज्ञा नाईक यांच्याकडून उपस्थित करण्यात आला होता.