करिअर म्हणजे काय?

career
राजस्थानातील कोटा येथे प्रवेश परीक्षेसाठी शिकवणी वर्गाला म्हणून राहिलेल्या १८ वर्षाच्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कोटा हे शहर राजस्थानमध्ये असले तरी ही मुलगी मात्र उत्तर प्रदेशातली होती. आपल्या मुलीला डॉक्टर करायचेच या कल्पनेने पछाडलेल्या तिच्या पालकांनी तिला तिच्या मनाच्या विरुध्द कोटा येथे शिकवणीसाठी पाठवले होते. या मुलीने आत्महत्या केली. असाच एक प्रकार मराठवाड्यात घडला. लातूर येथील एक मुलगी पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिला तिच्या मर्जीविरुध्द या विद्यालयात घातलेले होते. पण तिला लष्करात किंवा पोलिसात करिअर करायचे होते. तिची करिअरची कल्पना पालकांना मान्य नव्हती. त्यामुळे तिला नाईलाजाने अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकावे लागत होते. शेवटी तिने आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले. राजस्थानातल्या कोटा या गावात तर गेल्या वर्षभरात २४ विद्यार्थ्यांनी आपल्या हातून आपले जीवन संपवले आहे. कोटा ही करिअरच्या कल्पनेने झपाटलेल्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी कोचिंग क्लासची काशी झालेली आहे.

त्यामुळे या गावात तर ज्यांच्या डोक्यावर करिअरच्या कल्पना लादलेल्या असात असे हजारो विद्यार्थी येऊन राहतात. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा एकंदरीतच चिंतेचा विषय आहेच परंतु जेमतेम २ लाख वस्तीच्या एका गावातील २४ विद्यार्थी एका वर्षात आपले जीवन संपवतात तेव्हा तो अधिक चिंतेचा विषय होतो. तिथे नुकतीच आत्महत्या केलेल्या अंजली आनंद या १८ वर्षाच्या विद्यार्थिनीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या आईवडिलांची माफी मागितली आहे आणि आपण उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन वैद्यकीय प्रवेश परीक्षेला पात्र ठरलो नाही तर आईवडिलांना तोंड दाखवू शकणार नाही म्हणून आपण आत्महत्या करत आहोत असे म्हटले आहे. भारताच्या जवळजवळ सर्व प्रांतातले हजारो विद्यार्थी या शहरात केवळ कोचिंग क्लाससाठी म्हणून येतात. प्रवेश परीक्षांचे तंत्र जाणणार्‍या शिक्षकांनी कोटा गावाला कोचिंग क्लासेस हब म्हणून ख्याती मिळवून दिली आहे. ती ख्याती ऐकून मुलांचे करिअर घडवण्याच्या कल्पनेने झपाटलेले पालक वाटेल तेवढा खर्च करून मुलांना कोटा येथे पाठवायला लागले आहेत. तिथे वर्षभर राहणार्‍या विद्यार्थ्यांचा शिकवणीच्या फी सहीतचा खर्च साधारण ३ लाख रुपये असतो. त्यापेक्षा अधिक खर्च करणारेही अनेक विद्यार्थी आहेत आणि त्यातून या छोट्या गावाची उलाढाल ३०० कोटी रुपयांवर गेली आहे.

एवढा खर्च करून जो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी कोटाच्या भट्टीतून तापून निघणे पसंत करते तिच्या विषयी पालकांच्या अपेक्षा साहजिकच उंचावलेल्या असतात. एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी किती हुशार असावी याचे एक माप ठरलेले असते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्याची कुवत ६० टक्के गुण मिळवण्याची असते त्याला प्रयत्नाने फार तर ६५ टक्के किंवा ७० टक्के गुण मिळू शकतात. परंतु पालकांची धारणा अशी होते की आपण ज्या अर्थी मुलावर वर्षाला चार ते पाच लाख रुपये खर्च करत आहोत त्या अर्थी या मुलाला ९० टक्के गुण मिळालेच पाहिजेत. असे पालक मुलाला डॉक्टर किंवा इंजिनिअर करण्याच्या कल्पनेने इतके झपाटलेले असतात की त्यांना हे लक्षात येत नाही की मुलाला किती मार्क मिळावेत हे त्याच्या बौध्दिक क्षमतेवर अवलंबून असते. त्याच्यावर तुम्ही किती खर्च करता यावर ते अवलंबून नसते. त्यामुळे अशा विचित्र कल्पनापोटी ते मुलांकडून नको त्या अपेक्षा करत बसतात आणि मुलाला आपल्या महत्त्वाकांक्षेपोटी मोठ्या आव्हानात्मक परिस्थितीत ढकलतात. तिथे यश आले नाही की मुले निराश होतात आणि अशा निराश झालेल्या मुलांपैकी अधिक संवेदनशील मुले आत्महत्या करून आईवडिलांच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करतात.

मुलांच्या या मनःस्थितीचा अभ्यास होणे तर आवश्यक आहेच पण त्यांच्यावर नको तेवढे अपेक्षांचे ओझे टाकणार्‍या पालकांची मनोवृत्तीही बदलणे आवश्यक ठरले आहे. आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे असे वाटण्यात गैर काही नाही. तसा प्रयत्न करायलाही काही हरकत नाही. परंतु आपल्या कल्पनेप्रमाणे तो डॉक्टर होऊ शकत नसेल तर त्याच्या आणि आपल्या आयुष्यात काही अर्थ राहणार नाही असे मानणे मात्र चुकीचे आहे. किंबहुना ही एक विकृतीच आहे. जगामध्ये इंजिनिअर, डॉक्टर हीच काही करिअरची क्षेत्रे नाहीत आणि डॉक्टर किंवा इंजिनिअर होणे म्हणजेच जीवनाचे सार्थक नव्हे. इतर अनेक व्यवसाय करूनसुध्दा मुले चांगला पैसा कमवू शकतात. हे त्यांच्या गावीच नसते. किंबहुना निव्वळ पैसे कमवण्याला तरी जास्त महत्त्व का द्यावे हाही प्रश्‍न आहे. काही मुलांना आपल्या करिअरमध्ये किंवा व्यवसायातून थोडे कमी पैसे मिळाले तरी चालतील परंतु त्याला त्याच्या व्यवसायात समाधान मिळाले पाहिजे आणि विशेषतः तो मनाने सुखी झाला पाहिजे. याकडे पालकांनी लक्ष दिले गेले पाहिजे. म्हणून मुलांचा अभ्यासक्रम निवडताना त्याला ज्या अभ्यासक्रमात आनंद लुटता येईल तो अभ्यासक्रम निवडला पाहिजे. शिवाय जास्त पैसे मिळवणे म्हणजे सुखी होणे ही सुखाची व्याख्याही बदलली पाहिजे. गडगंज पैसा मिळवणार्‍या अनेक लोकांपेक्षा मर्यादित पैसे मिळवणारे अनेक लोक सुखी असतात. कारण सुख हा पैशाचा विषय नसून मनाचा विषय आहे.

Leave a Comment