कमला हॅरीस यांचे पती डग्लस एम्होफही रचणार इतिहास

फोटो साभार नवभारत टाईम्स

अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदी निवड होऊन कमला हॅरीस अमेरिकेच्या इतिहासात नवीन पान लिहिणार आहेतच पण त्याचबरोबर त्यांचे पती डग्लस एम्होफ हे सुद्धा इतिहास रचणार आहेत. एम्होफ पहिले सेकंड जंटलमन बनणार आहेत. अमेरिकेत राष्ट्रपतीची पत्नी फर्स्ट लेडी असते तर उप्रष्ट्रापतीची पत्नी सेकंड लेडी होते. अमेरीकेच्या आजपर्यंतच्या इतिहासात यापूर्वी कधीच महिला राष्ट्रपती अथवा उपराष्ट्रपती बनलेली नाही. त्यामुळे फर्स्ट जंटलमन किंवा सेकंड जंटलमन हे पद कुणीच भूषविलेले नाही. डग्लस मात्र प्रथम सेकंड जंटलमन पद भूषविणार आहेत.

कमल हॅरीस यांनी उपराष्ट्रपतीपदी निवडून येऊन अनेक नवी पदनामे नोंदविली आहेत. या पदावर निवडली जाणारी पहिली महिला, पहिली अश्वेत महिला, भारतीय वंशाची पहिली महिला, पहिली प्रवासी कन्या अशी ही नामावली आहे.

त्यांचे पती एम्होफ पेशाने वकील आहेत. कमला यांच्या निवडणूक प्रचारात त्यांनी महत्वाचे योगदान दिले आहे. शानिवारी त्यांनी पत्नीसह फोटो शेअर करताना, ‘मला तुझा खूप अभिमान वाटतो’ असे लिहिले आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार एम्होफ नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहिले आहेत. पत्नीसाठी काम करतानाही ते नेहमी पडद्यामागे होते किंवा सभेत दूर कुठेतरी कोपऱ्यात उभे राहत होते. ते गतवर्षी प्रथमच प्रसिद्धीत आले होते. त्यावेळी एका निदर्शकाने कमला हॅरीस यांच्या व्यासपीठावर चढून त्यांच्या हातातून मायक्रोफोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी हॅरीस यांच्या बचावासाठी एम्होफ यांनी व्यासपीठावर धाव घेतली होती.