रामसीतेने रावणाला हरविले, तसेच करोनाला हरवू- बोरीस जॉन्सन

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी हिंदू समाजाला दीपावली शुभेच्छा देताना श्रीराम आणि सीतेने जसा रावणाचा पराभव केला तसेच आम्ही करोनाचा पराभव करू शकतो असे म्हटले आहे. यावर्षी करोनामुळे आयग्लोबल दीपावली महोत्सव २०२० चे व्हर्च्युअल उद्घाटन करताना बोरीस बोलत होते.

बोरीस म्हणाले करोनाने आपल्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे पण देशातील नागरिक एकजुटीने आणि दृढ इच्छाशक्तीने करोनाला हरवतील. आपण सर्वानी त्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. दिवाळीचा उत्सव हा अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा, दुष्टांवर सुष्टांचा विजय आहे. श्रीराम, सीता जेव्हा रावणाला ठार करून घरी परतले तेव्हा लाखो दिवे पेटवून त्यांचे स्वागत केले गेले होते. आपणही आपला मार्ग शोधू शकतो. विजयी होऊ शकतो.

बोरीस पुढे म्हणाले, प्रकाशपर्व दिवाळी यंदा ब्रिटन मध्ये कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये साजरी करावी लागणार आहे. दिवाळी एकट्याने साजरा करण्याचा सण नाही. या काळात कुटुंब एकत्र येते. मित्रमंडळीना आमंत्रणे जातात. येणे जाणे होते. सामोसे गुलाबजाम यांच्या संगतीत उत्सवाचा आनंद आणखी वाढतो याची मला कल्पना आहे. पण त्याला अन्य पर्याय सध्यातरी नाही.