या बँकेचे खातेदार १८ वर्षाखालचे

balgopal
गुजराथेतील साबरकांठा व अरवली जिल्ह्यात गेली अनेक वर्षे बालगोपाल बँक कार्यरत आहे. सात हजारांहून अधिक खातेदार असलेल्या या बँकेचे वैशिष्ठ म्हणजे तिचे सर्व खातेदार ० ते १८ याच वयोगटातील आहेत. बॅकेकडे जमा रक्कम आहे साडेतीन कोटी रूपये. देशातील अज्ञान मुलांसाठीच काम करणारी ही पहिली व एकमेव बँक आहे असे संस्थापक अश्विन पटेल सांगतात.

पटेल म्हणाले अनेकदा मी लोकांकडे गेलो असताना घरातील लहान मुलांच्या हातात पाहुणे पैसे ठेवतात असे पाहिले. ही मुले त्या पैशांचा खाऊ आणून खातात किवा अन्यत्र खर्च करतात. तेव्हाच या लहान मुलांना पैशांची बचत करण्याची सवय लावावी व ही बचत त्यांनाच त्यांच्या पुढच्या आयुष्यात उपयुक्त ठरावी यासाठी बँक स्थापन करण्याची कल्पना सुचली. सुरवात पाच खातेदार मुलांपासून केली व आज आमचे ७ हजारांहून अधिक खातेदार आहेत.

आम्ही घरोघरी मुलांना पैसे साठविण्यासाठी पिगी बँक देतो. दर महिना बँकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन मुले व त्यांच्या पालकांदेखत पिगी बँक उघडून त्यातील पैसे बँकेत भरतात व त्याची नोंद पासबुकावर करतात. जमा पैशांवर ८ टक्के व्याज दिले जाते. तसेच गरज असेल तर ८० टकक्यांपर्यंत ओव्हरड्राफ्टही दिला जातो. पुढच्या काळात शिक्षण, आजारपण यासाठी हा पैसा उपयोगी येतो. हे पैसे घरोघरी गोळा करण्याचे काम गृहिणीच करतात त्यांनाही ४ टक्के कमिशन दिले जाते.

खातेदार १८ वर्षांचा झाला की त्याला जमा रक्कम व्याजासह परत दिली जाते. बँक जमा राशीपैकी अर्धी रक्कम सरकारी बाँडमध्ये गुंतविते तर बाकी रक्कम बॅकेकडेच असते असेही पटेल यांनी सांगितले. बँकेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून संपूर्ण गुजराथ राज्यात शाखा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment