ब्रेन गेन

brain-gain
भारतातून अनेक बुध्दिवान लोक परदेशात गेले तेव्हा त्याला ब्रेन ड्रेन म्हणजे बुध्दिमत्ता वाहून परदेशात जाणे असे म्हटले गेले पण आता उलटी प्रक्रिया सुरू झाली आहे. आता परदेशात गेलेले लोक भारतात परत येऊ इच्छित आहेत. त्यामुळे या प्रक्रियेला ब्रेन गेन म्हणजे बुध्दिमत्ता परत मिळवणे असे म्हटले जायला लागले आहे. भारतातले वातावरण चांगले नाही म्हणून हे लोक परदेशी गेले होते. अशा लोकांना आता भारतात यावेसे वाटायला लागले आहे. कारण भारतातल्या ज्या कमतरतांमुळे परदेशात आलो त्या कमतरता आता कमी होत आहेत अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.

आता आपण भारतात परत गेलो तर आपले काही नुकसान होणार नाही अशी त्यांना खात्री वाटत आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून ही प्रक्रिया परदेशात सुरू झाली होती. परंतु आता तिला गती आली आहे आणि संघटित रूप आले आहे. अमेरिकेत स्थायिक असलेल्यांनी वायआयएम ही संघटना स्थापन केली असून या संघटेनेने घरवापसी करण्यास उत्सुक असलेल्या शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. भारतातील आयआयटीमधील आणि अन्य काही शिक्षण संस्थांतील पदाधिकार्‍यांनी अशा अमेरिकन शास्त्रज्ञांशी संवाद सुरू केला असून लवकरच यातील काही शास्त्रज्ञ भारतात परतण्याची शक्यता आहे. अशीच प्रक्रिया ब्रिटनमध्येही सुरू झाली आहे. लंडनमध्ये स्थायिक झालेल्या काही भारतीयांनी परत येऊ इच्छिणार्‍यांची एक संघटना स्थापन केली आहे.

आपल्याला देशात परत जाण्यास नरेंद्र मोदी यांचे प्रयत्नच उपयोगी ठरतील असा त्यांना विश्‍वास इतका दृढ आहे की त्यांनी आपल्या या संघटनेला मोदी एक्स्प्रेस असे नाव दिले आहे. विशेष म्हणजे या मोदी एक्स्प्रेसमध्ये एक हजार भारतीय तरुण सहभागी झाले आहेत. यातले काही भारतीय लंडनमध्ये स्थायिक होण्यासाठी बरेच कष्ट करून थकलेले आहेत. आता लंडन आणि भारत यात फार फरक नाही, ज्या कारणांसाठी देश सोडला ती कारणे आता भारतात फारशी तीव्रपणे जाणवत नाहीत, असे त्यांना वाटते. भारतामध्ये मोदींचा द्वेष करणारा जो एक वर्ग तयार झाला आहे त्या वर्गाने अच्छे दिन या शब्दांची टवाळी करायला सुरूवात केली असली तरी लंडनमधल्या मोदी एक्स्प्रेसच्या सदस्यांना भारतात अच्छे दिन येतील असा विश्‍वास वाटत आहे. भारतात मोदींच्या काळात गुंतवणुकीला चालना मिळेल हा विश्‍वास सार्थ ठरत आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीची शक्यता वाढली आहे.

Leave a Comment