यंदा दिवाळीत करा आरोग्यदायी फराळ


दिवाळीत तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो. रवा- बेसनाचे लाडू, भाजणीची चकली, पोह्यांचा चिवडा, शंकरपाळे असा फराळाचा थाट सगळ्यांकडेच असतो. शिवाय हे सारे पदार्थ पचायलाही जड असतात. म्हणूनच यावेळी फळांचा वापर करून आरोग्यदायी फराळ बनूया…

अंजीर लाडू

साहित्य – 10 सुके अंजीर, एक वाटी खवा किंवा मिल्क पावडर, दोन वाट्या कणीक, अर्धी वाटी साजूक तूप, दीड वाटी पिठीसाखर, वेलदोडे पूड, काजू, बदाम.

कृती – चार तास अंजीर पाण्यात भिजत घालावेत. पाणी काढून अंजीर मिक्‍सरमधून वाटून घ्यावेत. तुपावर अंजीर घालून थोडे भाजावेत. त्यातच कणीक, खवा घालून भाजावा. मिश्रण थोडे थंड झाल्यावर पिठीसाखर, वेलदोडे पूड घालून हलक्‍या हाताने मळावे. छोटे लाडू वळावेत. वरून काजू, बदाम काप लावावेत. चांदीचा वर्ख लावून लाडू सजवावेत. खायला रुचकर, पौष्टिक आहेत. दिवाळीसाठी अंजीर लाडू करावेत. पटकन होतात.

अननस पोळी

साहित्य – एक लहान पिकलेला अननस किंवा 7-8 अननस चकत्या. दोन वाट्या नारळचव, दीड वाटी साखर, तीन वाट्या बारीक रवा, दोन वाट्या मैदा, चिमूटभर मीठ, तूप.

कृती – रवा, मैदा चाळून त्यात मीठ, तीन चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालून घट्ट भिजवून ठेवावे. अननस सोलून चिरून मिक्‍सरमधून बारीक वाटावा. साखर, नारळचव एकत्र करून घट्ट शिजवावे. त्यात वाटलेला अननस घालून शिजवावे. घट्ट सारण तयार करावे. पिठाचा उंडा करून त्यात अननसाचे सारण घालून पोळी लाटावी. दोन्ही बाजूने तूप सोडून खरपूस पोळी भाजावी. अननस स्वादाची पोळी दोन दिवस चांगली राहते.

सफरचंदाचा पुलाव

साहित्य – तीन सफरचंद, दोन वाट्या बासमती तांदूळ, दीड वाटी साखर, चार चमचे तूप, दोन तमालपत्रे, दालचिनी तुकडा, 5-6 लवंगा, वेलदोडे पूड, काजू, बदाम.

कृती – तांदूळ धुऊन दोन तास ठेवावेत. सफरचंदाची साल, बिया काढून उभे पातळ काप करावेत. एक वाटी पाणी घालून काप वाफवून घ्यावेत. पाणी काढून काप निथळत ठेवावेत. पाणी भातासाठी वापरावे. पातेलीत तूप, लवंगा, दालचिनी, तमालपत्रे घालून फोडणी करावी. फोडणीत तांदूळ घालून परतावेत. चार वाट्या गरम पाणी, चवीला मीठ घालून भात शिजवावा. वाफ जिरली, की भात मोकळा करून थंड होण्यास ठेवावा. साखर, एक वाटी पाणी घालून पाक करावा. पाकात वेलदोडेपूड, वाफवलेले काप घालावेत. दोन मिनिटे उकळल्यावर काप काढून ठेवावेत. पाकात मोकळा केलेला भात घालून मिसळावा. एक वाफ आली, की भाताचेवर सफरचंदाचे काप, काजू, बेदाणे, बदाम काप घालून सजवावे. केशरकाड्या घालाव्यात. श्रीमंती थाटाचा भात दिवाळीसाठी करावा.

फ्रूट पिझ्झा

साहित्य – चार पिझ्झा बेस, दोन मोसंबी, दोन संत्री, दोन केळी, दोन सफरचंद, दोन चकत्या अननस, दोन चिक्कू, एक आंबा (सीझन असेल तर), बेदाणे, काजू, वेलदोडे पूड, 5-6 लवंगा, अर्धी वाटी साखर, चार चमचे लोणी, चीज.

कृती – सर्व फळे सोलून बारीक फोडी कराव्यात. चिक्कू, सफरचंदाचे उभे काप, केळ्याच्या गोल चकत्या कराव्यात. बाऊलमध्ये सर्व फळांच्या फोडी घालाव्यात. एक चमचा तुपावर काजू, बेदाणे, बदाम काप, लवंगा घालून परतावे. फळांवर घालून मिसळावे. साखर, वेलदोडे पूड, चवीला मीठ घालून सर्व मिसळावे. फळांचे टॉपिंग तयार करावे. सपाट तव्यावर लोणी घालून पिझ्झा बेसची खालची बाजू कुरकुरीत भाजावी. वरच्या भागावर लोणी पातळ करून पसरावे. त्यावर फळांचे मिश्रण घालून दाबावे. वरून चीज कीस घालावा. आवडत असेल तर चिमूटभर मिरपूड भुरभुरावी. पिझ्झाचे चार भाग करून सजलेला फ्रूट पिझ्झा वाढावा. फळांनी सजलेली पिझ्झा डीश सर्वांना आकर्षित करते.

Leave a Comment