विधान परिषदेसाठी लायकीचे उमेदवार नसल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीने “वंचित’ची माणसे पळवली


अकोला – अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी लायकीची माणसे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना त्यांनी पळवल्याचा आरोप केला.

नांदेड लोकसभेची निवडणूक ‘वंचित’च्या तिकिटावर लढवलेले व सव्वा लाखाच्या जवळपास मते घेतलेले यशपाल भिंगे व चंद्रपूर येथून ‘वंचित’च्या तिकिटावर विधानसभा लढवलेले अनिरुद्ध वनकर यांची नावे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेसाठी राज्यपालांकडे पाठवली.

त्याचबरोबर कोरोना परिस्थितीवर भाष्य करताना केंद्र सरकारने अनलॉक ४ ची नियमावली जाहीर केली. त्यात मंदिरे उघडण्याची परवानगी त्यांनी दिली आहे. पण राज्य सरकारने केंद्र सरकारचे ऐकायचेच नाही, अशी भूमिका घेतली आहे. मॉल, बार सुरू केले आहे. कोरोना तेथून पसरत नाही आणि मंदिरे उघडली तर कोरोना कसा होईल, असा प्रश्न त्यांनी विचारला. आचार्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आचार्य उपमुख्यमंत्री व आचार्य बाळासाहेब थोरात असा उपरोधिक नामोल्लेख करून या आचार्यांना हरिभक्त पारायण मंडळींची अ‍ॅलर्जी झाल्याचा आरोप अॅड. आंबेडकर यांनी केला.

हिंदूंबाबत वंचित बहुजन आघाडी मवाळ होत आहे का, यावर प्रश्नावर अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, आम्ही पक्ष म्हणून सेक्युलर असलो तरी अभिव्यक्तीनुसार लोकांना धार्मिक भावना जपण्याचा अधिकार आहे. तो मिळवून देण्यासाठी आमची मंदिरे उघडण्याची लढाई सुरू आहे. मंदिरे उघडण्यासाठी राज्य सरकारला राज्यातील हभपंनी वारंवार विनंत्या केल्या, पण राज्य सरकार ऐकत नसल्याचेही अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.