रोहित पवारांच्या थेट अमेरिकेच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांना शुभेच्छा


मुंबई – अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहिर झाला असून अमेरिकेत आता सत्तांतर झाले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. जगभरातून या विजयाबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा अमेरिकेतील सत्तांतराचा अंदाज खरा ठरल्यानंतर असाच बदल बिहार निवडणुकीच्या निकालातही दिसण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. हा विजय अमेरिकेतील हेकेखोर सरकारविरोधातील असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आपल्या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी लिहिले की, अमेरिकेतील हेकेखोर सरकारविरोधातील हा विजय असून अमेरिकन मतदारांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणलेला हा नवा बदल आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. असाच बदल बिहारच्या निकालातही दिसेल अशी अपेक्षा आहे.


रोहित पवार यांनी यापूर्वी अमेरिकेत सत्तांतराचा अंदाज वर्तवला होता. जो बायडेन फ्लोरिडा येथे भाषण करत असताना जोरदार पाऊस सुरु झाला. तरीही न डगमडता त्यांनी भाषण सुरुच ठेवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही सातारा येथील मुसळधार पावसातील भाषण सर्वांच्याच लक्षात आहे. त्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाले. दोन्ही मुसळधार पावसातील भाषणांचा संबंध जोडत अमेरिकेतही सत्तांतर होईल, असा अंदाज रोहित पवार यांनी वर्तवला होता आणि तो खरा ठरला आहे. त्यामुळे आता बिहार निवडणुकीबद्दलची त्यांची अपेक्षा प्रत्यक्षात उतरते का, हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल.