राम कदम यांचे अर्णब गोस्वामी यांच्या सुटकेसाठी सिद्धिविनायकाला साकडे


मुंबईः रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची सुटकेसाठी भाजप नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यातच गोस्वामी यांच्या सुटकेसाठी उपोषण करणारे भाजप आमदार राम कदम यांनी आता सिद्धिविनायकाला साकडे घातले आहे.

मागील बुधवारी सकाळी रायगड पोलीस आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक केली होती. अटकेनंतर आज त्यांची रवानगी मंबईतील तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. भाजपने अर्णब यांच्या अटकेनंतर राज्यभरात आंदोलने केली होती. तर, केंद्रीय मंत्र्यांनीही निषेध व्यक्त केला होता. अर्णब गोस्वामींच्या सुटकेसाठी भाजपचे आमदार राम कदम यांनी सुद्धा प्रयत्न करत आहेत.

आज घाटकोपर येथील निवासस्थानापासून प्रभादेवीच्या सिद्दिविनायक मंदिरापर्यंत भाजप आमदार राम कदम यांनी पदयात्रा केली असून त्यांनी अर्णब यांच्या सुटकेनंतर दिवाळी साजरी करणार असल्याचे म्हटले आहे. तर, राम कदम यांनी दोन दिवसांपूर्वी मंत्रालयासमोर उपोषण सुरु केले होते. पण, त्यांनी हे आंदोलन पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर मागे घेतले.