मदरशांमधून होत आहे लव जिहादचा प्रसार; साध्वी प्राची यांचे वादग्रस्त वक्तव्य


लखनऊ – पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य विहिंप नेत्या साध्वी प्राची यांनी उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये केले आहे. त्यांनी लव जिहाद प्रकरणावरुन गौप्यस्फोट केला आहे. लव जिहादचा प्रसार मदरशांमधून केला जात असून अरब देशांमधून यासाठी पैसा येत असल्याचा दावा साध्वी प्राची यांनी केला आहे. अशा घटनांची चौकशी सरकारने करण्याची गरज असल्याचे सांगत लव जिहाद करणाऱ्यांना फाशी देण्याची मागणीही साध्वी प्राची यांनी केली आहे. लखनऊमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

साध्वी प्राची यांनी केलेल्या या लक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. लव जिहादचा प्रसार मदरशांमधून केला जात आहे. हा प्रकार अरब राष्ट्रांमधून येणाऱ्या पैशामुळे वाढीस लागला आहे. आपल्या जाळ्यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र जातीमधील मुलींना अडकवण्यासाठी 10 ते 25 लाखांचा निधी दिला जात असल्याचा दावा साध्वी प्राची यांनी केला. मंदीरात नमाज पठनाचा एक प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. हा प्रकार षडयंत्र असल्याचे साध्वी प्राची यांनी म्हटले आहे.

भाईचारा गँग देशात सक्रिय असून मी त्यांना इतकेच सांगू इच्छिते की एकता देशात कायम राहावी यासाठी मी मशिदीत हवन करू इच्छिते, असे म्हटले आहे. देशातील संतांची सर्वात मोठी परिषद असलेल्या आखाडा परिषदेने साध्वी प्राची यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. साध्वी प्राची यांनी भडकाऊ वक्तव्य करणे टाळले पाहिजे असा सल्ला आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी दिला आहे.