जाणून घ्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे भारताशी असलेल्या नात्याबाबत


नवी दिल्ली – संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकांमध्ये जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मात करत विजय मिळवला आहे. तसेच अमेरिकेला या निवडणुकीत पहिल्यांदाच एक महिला उपराष्ट्राध्यक्ष मिळाल्या आहेत. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली आहे. पहिल्यांदाच जगाची महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार सांभाळणाऱ्या कमला हॅरिस यांच्या बद्दलची माहिती आम्ही आमच्या वाचकांना देत आहोत.

कमला हॅरिस यांची आई भारतीय, तर वडिल जमेकाई वंशाचे आहेत. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पदी विराजमान होणाऱ्या त्या भारतीय वंशाच्या पहिल्या अमेरिकन आहेत. 1964 मध्ये ऑकलँडमध्ये कमला हॅरिस यांचा जन्म भारतीय वंशाच्या श्यामला गोपालन हॅरिस आणि जमेकाई वंशाचे वडिल डोनाल्ड हॅरिस यांच्या घरी झाला. स्टॅनफोर्ड युनिवर्सिटीमध्ये त्यांचे वडिल अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते आणि स्तन कॅन्सर या विषयावर संशोधन करणाऱ्या संशोधक त्यांच्या आई होत्या. वडिलंपासून कमला हॅरिस विभक्त झाल्यानंतर कमला यांच्या आईनेच त्यांचा सांभाळ केल्यामुळे आईसोबत त्या आपल्या भारतात येत असत.

भारतात हॅरिस यांच्या आईचा जन्म झाला आहे. शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेल्या आणि तिकडेच स्थायिक झाल्या. कमला यांना घेऊन त्या नेहमी आपल्या कुटुंबाला भेटायला भारतात यायच्या. कमला यांचे आजोबा पी.व्ही. गोपालन हे नंतरच्या काळात चेन्नईला स्थायिक झाले. आजोबांसोबत आपण पाच वर्षाचे असताना थुलसेद्रपूरम या मूळ गावी फेरफटका मारल्याचे कमला यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन सांगितले होते.

कमला हॅरिसही आपल्या आई-वडिलांप्रमाणेच उच्चशिक्षित आहेत. 1998 मध्ये त्यांनी ब्राउन युनिवर्सिटीमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कॅलिफोर्निया युनिवर्सिटीमधून त्यांनी कायद्याची पदवी मिळवली. तसेच त्यानंतर त्यांनी फ्रांसिस्को डिस्ट्रिक्ट अटॉर्नी ऑफिस जॉईन केले. त्यांना जिथे करियर क्रिमिनल यूनिटचे इंचार्ज केले होते.

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पदापर्यंतचा हॅरिस यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. सॅन फ्रान्सिस्कोच्या काउंटीच्या डिस्ट्रिक अटॉर्नी म्हणून त्यांची सर्वातआधी 2003 मध्ये निवड करण्यात आली होती. त्यानंतर कॅलिफोर्नियाच्या अटॉर्नी जनरल म्हणून त्यांनी काम पाहिले होते. 2017 मध्ये हॅरिस यांनी कॅलिफोर्नियातून संयुक्त राज्य सीनेटर म्हणून शपथ घेतली होती. त्या असे करणाऱ्या दुसऱ्या कृष्णवर्णीय महिला होत्या. होमलँड सिक्योरिटी अँन्ड गवर्नमेंट अफेयर्स कमिटी, इंटेलिजेंस सिलेक्ट कमिटी, ज्यूडिशियरी कमिटी आणि बजेट कमिटीमध्येही त्यांनी काम केले आहे.

त्यांनी आपल्या कामामुळे अनेक लोकांची मनं जिंकली आणि त्यामुळेच त्यांनी लोकांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. खासकरून त्यांच्या भाषणांना ‘ब्लॅक लाइव्स मॅटर’ अभियाना दरम्यान लोकांचे मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळाले. हॅरिस सिस्टमॅटिक नक्षलवाद संपवण्याच्या हेतू समोर ठेवून नेहमी बोलत असतात. 21 जानेवारी, 2019 रोजी 2020 मधील राष्ट्रपती निवडणुक लढणार असल्याची घोषणा कमला हॅरिस यांनी केली होती. दरम्यान, 3 डिसेंबर रोजी राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून त्यांनी निवडणुकीतून आपले नाव मागे घेतले. त्या तेव्हापासून बायडन यांच्या समर्थक आहेत.