लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली


पाटणा – बिहार विधानसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा कालच पार पडला असून पुढील दोन दिवसात बिहारच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होईल हे स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्वच स्तरातून एक्झिट पोल येत आहेत. पण याचदरम्यान बिहारचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे.

लालू प्रसाद यादव यांच्यावर रांची येथील रिम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या जामीनावर शनिवारी सुनावणी झाली. पण, त्यांचा जामीन न्यायालयाने मंजूर न केल्यामुळे लालू प्रसाद यादव मानसिक तणावात गेले आहेत. तसेच लालूंच्या क्रियेटनीन पातळीत मधुमेहाचा आजार असल्याने अचानक वाढ झाली आहे.

प्रसारमाध्यमांनी रिम्समध्ये लालूंवर उपचार करत असलेल्या डॉ. उमेश प्रसाद यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार क्रियेटनीन पातळी अशीच वाढली तर लालूप्रसाद यादव यांना डायलिसिस करण्याची आवश्यकता भासू शकते. याबाबतची माहिती उच्च न्यायालयाला देण्यात आली आहे. लालू प्रसाद यादव यांच्या आरोग्याबाबतचा अहवाल उच्च न्यायालयाने रिम्स प्रशासनाकडून मागवला होता.

जेव्हा रिम्समध्ये उपचारासाठी लालू प्रसाद यादव दाखल झाले होते, तेव्हा त्यांची किडनी ३ बी स्टेजला होती. ती सध्या ४बी स्टेजला पोहचली आहे. लालू यांची किडनी सध्या फक्त २५ टक्के काम करत आहे. त्यांच्या किडनीच्या कार्यक्षमतेमध्ये मागील काही दिवसांमध्ये १० टक्के घट झाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये आणखी घट झाल्यास त्यांना तातडीने डायलिसीस करण्याची आवश्यकता भासू शकते, असे रिम्समध्यील तज्ज्ञांनी सांगितले.