जो बायडन अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष


वॉशिंग्टन – अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा जो बायडन यांनी पराभव करत ते अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. तत्पूर्वी ही निवडणूक जिंकल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी अवघे एका ओळीचे ट्विट करुन केला होता. पण प्रत्यक्षात ही निवडणूक जो बायडन यांनी जिंकली आहे. जो बायडन यांचा विजय झाल्याचे अमेरिकेतील वृत्तसंस्थांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान जो बायडन यांनी हा निकाल समोर येताच पहिले ट्विट करुन अमेरिकेतील जनतेचे आभार मानले आहेत. मला राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत अमेरिकेच्या जनतेने पोहचवले हा मी माझा बहुमान समजतो, असेही जो बायडन यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. मला तुम्ही मत दिले असो की नसो मी सगळ्या अमेरिकेच्या नागरिकांसाठी चांगले काम करणार या आशयाचे वाक्यही बायडन यांच्या ट्विटमध्ये आहे.

आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन शपथ घेतील. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांनी पराभव केल्याचे स्पष्ट झाले आहे. अवघ्या जगाचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले होते. सुरुवातीला जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ही लढत अत्यंत चुरशीची झाली. पण जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पिछाडीवर टाकत आघाडी घेतली तेव्हा तेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार हे चित्र जवळपास स्पष्ट झाले होते. आता त्यावरच अमेरिकेच्या जनतेनेही शिक्कामोर्तब केले आहे.

जो बायडन हेच जॉर्जिया आणि पेनसिल्वेनिया या दोन राज्यांमध्येही आघाडीवर असल्याने ते जिंकले असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून तेच शपथ घेतील असे वृत्त तेथील प्रसारमाध्यमांनी दिले आहे. अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन शपथ घेतील.