एम्सच्या संचालकांची माहिती; २०२२ नंतरच सर्वसामान्यांना मिळणार कोरोनाची लस


नवी दिल्ली – देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्यापही कायम असून दिल्लीत या दुष्ट संकटाची तिसरी लाट सुरु आहे. आगामी सणांच्या काळात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात आली असून जगासह आपल्या देशातील नागरिकांच्या नजरा सध्या कोरोना प्रतिबंधक लस कधी येणार याकडे लागून राहिल्या आहेत. त्यातच आता दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सर्वसामान्यांना कोरोना प्रतिबंधक लस लवकर मिळण्याची शक्यता कमी दिसत असल्याचे संकेत दिले आहेत.

डॉ. गुलेरिया यांनी नेटवर्क १८ ला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना कोरोना परिस्थिती व लसीबाबत भाष्य केले. गुलेरिया हे एम्सच्या संचालक असण्याबरोबरच कोरोना व्यवस्थापनासाठी तयार करण्यात आलेल्या नॅशनल टास्क फोर्सचे सदस्य आहेत. डॉ. गुलेरिया म्हणाले, कोरोना व्हायरस सध्या तरी संपणार नाही. कोरोनावरील लस भारतात येण्यासाठी अजून एक वर्ष तरी लागू शकते. भारतातील लोकसंख्या खूप जास्त आहे. ज्याप्रमाणे इतर आजारांवरील लसींप्रमाणेच कोरोनाची लस सहज उपलब्ध होण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे कोरोना लस सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक वर्षांपेक्षा अधिक काळ लागणार असल्याचे गुलेरिया म्हणाले.

देशासमोर कोरोना लस आल्यानंतर कोणते आव्हान असणार आहे? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. गुलेरिया त्यावर बोलताना म्हणाले, लसींच्या वितरणाला आमची प्राथमिकता असेल, कारण लस देशातील सर्वच भागात पोहोचायला हवी. कोल्ड चेन सांभाळून पुरेशा प्रमाणात देशातील सर्वच भागात इंजेक्शनही पोहोचवणे आमच्यासमोर महत्त्वाचे आव्हान असल्याचे गुलेरिया यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यातील लशींनंतर दुसऱ्या टप्प्यात येणारी लस अधिक प्रभावी असेल. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील लसीचे काय करायचे? त्यानंतर आम्हाला ठरवावे लागणार आहे की, पहिल्या टप्प्यातील लस कुणाला द्यायची आणि कुणाला दुसऱ्या टप्प्यातील लस द्यायची. एकाच वेळी खूप सारे निर्णय घेण्याची गरज असेल, असे गुलेरिया म्हणाले.