अर्णब गोस्वामींच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी


मुंबई – मुंबई उच्च न्यायालय उद्या (सोमवार) रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या यांच्या तातडीच्या जामीन अर्जावर निर्णय देणार आहे. त्यामुळे आता उद्याच अर्णब गोस्वामी यांना जामीन मिळणार की नाही याचा निर्णय होणार आहे. अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आली. आता उद्या त्यांच्या जामिनावर निर्णय होणार आहे. उद्याही जर त्यांना जामीन मिळाला नाही तर तुरुंगातील अर्णब गोस्वामी यांचा मुक्काम वाढण्याची चिन्ह आहेत.

अलिबाग पोलिसांनी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या पोलीस कोठडीसाठी दाखल केलेल्या पुनर्निरीक्षण अर्जावरील सुनावणी सोमवार, ९ नोव्हेंबपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आपले म्हणणे मांडण्यासाठी आरोपींच्या वकिलांनी मुदत मागून घेतल्यामुळे सुनावणी स्थगित करण्यात आली.

अलिबाग पोलिसांनी ४ नोव्हेंबरला वास्तुविशारद अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल अर्णब गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सारडा यांना अटक केली होती. तिघांना अलिबागच्या मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पोलिसांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात अलिबाग सत्र न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्ज केला होता.