टी-सेल्सवरील महत्त्वपूर्ण संशोधनाचे निष्कर्ष; सहा महिन्यांपर्यंत पुन्हा होणार नाही कोरोना


नवी दिल्ली – जेव्हापासून संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट ओढावले आहे, तेव्हापासूनच जगभरातील संशोधक त्यावर संशोधन करत आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचे संशोधन म्हणजे विषाणू व रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती समजून घेणे हे होते. एखाद्याला कोरोनाची बाधा झाल्यानंतर पुन्हा किती काळ संसर्ग होऊ शकत नाही. म्हणजेच, त्यामध्ये तयार केलेल्या अँटीबॉडीज रुग्णाला किती काळ वाचवू शकतात अशी अलिकडे जगभरात चर्चा होती.

यावर पब्लिक हेल्थ इंग्लंड या ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा संस्थेचे नवे संशोधन अलीकडे समोर आला आहे. त्यानुसार, कोरोनाची बाधा झाल्यानंतर रुग्णामध्ये ज्या टी- सेल्स निर्माण होतात त्या ६ महिन्यापर्यंत रुग्णाला दुसऱ्यांदा संसर्ग होण्यापासून वाचवू शकतात.

याबाबत माहिती देताना इंग्लंडच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे सल्लागार शमेज लधानी म्हणाले, हे संशोधन १०० कोरोनाबाधितांवर करण्यात आले. दुसऱ्यांदा टी-सेल्सचे मूल्यमापन करणे आम्हाला अवघड झाले. त्यामुळे त्याच्यावर कमी अभ्यास केला जातो. परंतु, चांगली गोष्ट म्हणजे संशोधनात अभ्यास केलेल्या सर्व रुग्णांमधील टी- सेल्सची पातळी ६ महिन्यानंतरही समाधानकारक होती. म्हणजे अँटीबॉडी संपल्या तरी टी-सेल्स एखाद्या व्यक्तीस संसर्ग होण्यापासून वाचवू शकतात.

रोगप्रतिकारक शक्तीचा अँटीबॉडीज असा भाग आहे, जो विषाणूवर थेट हल्ला करतो व रुग्णांना संसर्ग होण्यापासून वाचवतो. टी-सेल्स थेट विषाणूवर आक्रमण करण्याऐवजी संक्रमित पेशींवर हल्ला करतात आणि संसर्ग पसरण्यापासून रोखतात.