फटाकेबंदीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा


मुंबई – सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्याला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, तुमच्यावर दिवाळीत कोणतीही आणीबाणी मी लादणार नाही. आपण सगळ्यांनी दिवाळीचा सण नक्की साजरा केला पाहिजे, पण प्रदूषण पसरवणारे फटाके वाजवणे टाळा. फटाक्यांवर बंदी घालायची का? ती जरुर घालता येईल पण ती मुळीच घालणार नाही. आत्तापर्यंत जसे सहकार्य तुम्ही सगळ्यांनी केले तसेच दिवाळीलाही करा. घरात, इमारतीला रोषणाई करा. दिवे लावा, फटाकेही वाजवा पण मर्यादित स्वरुपात वाजवा असेही आवाहन केले आहे.

त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवायचे नाहीत, असेही सांगितले आहे. फटाक्यांवर बंदी घातलेली नाही. पण प्रदूषण पसरवणारे फटाके वाजवू नका आणि मर्यादित स्वरुपात फटाके वाजवा असे आवाहनही त्यांनी केले आहे. आपण सगळ्यांनी जे सहकार्य लॉकडाउनच्या काळात केले त्यामुळे आपण सगळेच काहीसे तणावमुक्त आहोत. पण माझ्या मनात दुसऱ्या लाटेची चिंता आहे. दुसरी लाट येऊ नये यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करत असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये गेले काही दिवस कोरोनाचा चढता आलेख आपण जिद्दीने खाली आणला आहे. काही लोक म्हणत होते की परिस्थिती यांच्या हाताबाहेर चालली आहे, पण सरकारच्या कामामुळे उत्तर मिळाले आहे. दिल्लीत तर कोरोना रुग्णांची संख्या वाढता वाढे अशीच आहे. कोरोनाबाधितांची संख्या प्रदुषणामुळे वाढू नये यासाठी काळजी घ्यायची आहे.