कर्करुग्ण महिला लक्षणांशिवाय तब्बल ७० दिवस करोनाग्रस्त


वॊशिंग्टन- रक्ताच्या कर्करोगाची रुग्ण असलेल्या ७० वर्षीय महिलेच्या शरिरात किमान ७० दिवस करोनाच्या विषाणूने ठाण मांडूनही तिच्यामध्ये करोनाचे कोणतेही लक्षण दिसून आले नाही. ही बाब अनपेक्षित नसली तरीही आजपर्यंत असे उदाहरण नोंदविण्यात आलेले नाही, अशी माहिती या रुग्णाची नियमित तपासणी करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे.

कर्करोगावर उपचार सुरू असताना या महिलेची तब्बल १०५ दिवस नियमितपणे करोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी किमान ७० दिवसांच्या काळात ती करोनाच्या विषाणूने संसर्गित असल्याचे आढळून आले. मात्र, तिच्यामध्ये करोनाचे कोणतेही लक्षण आढळून आले नाही. कदाचित कर्करोगासारख्या गंभीर विकाराशी ती सामना करीत असल्यामुळे तिच्या शरीराने करोनाच्या विषाणूंना प्रतिसाद दिला नाही किंवा त्यांच्याशी जुळवून घेतले, अशी शक्यता संशोधक विन्सेन्ट मनस्टर यांनी व्यक्त केली.

करोनाचा विषाणू सुप्त स्वरूपात अधिकाधिक किती काळ राहू शकतो अथवा एखादी संसर्गित व्यक्ती लक्षणांशिवाय किती काळ संसर्गित राहू शकते याची निश्चित माहिती या महासाथीच्या काळात उपलब्ध नव्हती. मात्र, या बाबत नियमितपणे संशोधन आणि निरीक्षणे सुरू आहात. कारण या विषाणूच्या वर्तनाचा अभ्यास असणे आवश्यक आहे, असे मनस्टर यांनी स्पष्ट केले.