तळोजा कारागृहात अर्णब गोस्वामी यांची रवानगी


रायगड – अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग येथील मराठी शाळेतील क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेले रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली असतानाच आता तळोजा येथील कारागृहात त्यांची रवानगी करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार अर्णब गोस्वामी यांची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबईतील राहत्या घरातून अटक केली होती. त्यांना तिथून रायगडमध्ये नेण्यात आले होते. तिथे न्यायालयात हजर केले असतान त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. अर्णब गोस्वामी यांना तेव्हापासून अलिबाग येथील मराठी शाळेतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते.

दरम्यानच्या काळात जामीनासाठी अर्णब गोस्वामी हे प्रयत्न करत आहेत. न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली होती. तर रायगड पोलिसांनी अधिक तपासासाठी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. या प्रकरणावरून न्यायालयीन लढाई सुरू असतानाच अर्णब गोस्वामी यांना सुरक्षेच्या कारणावरून अलिबाग येथील मराठी शाळेतील क्वारंटाईन सेंटरमधून तळोजा कारागृहात नेण्याचा निर्णय़ पोलीस प्रशासनाने घेतला आहे. अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोझ शेख आणि नितेश सारडा या या प्रकरणातील अन्य आरोपींनाही तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहे.