आता पदवीधर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अभिजित बिचुकले


पुणे: आता पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा निर्णय राष्ट्रपतीपद, लोकसभा आणि विधानसभा अशा जवळपास प्रत्येक निवडणुकीत आपले नशीब आजमावून झालेले ‘बिग बॉस’ फेम अभिजित बिचुकले यांनी घेतला आहे. अभिजित बिचुकले यांनी त्यासाठी शनिवारी पुणे पदवीधर मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा अभिजित बिचुकले यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.

आपल्या अनोख्या स्टाईलमुळे कला, साहित्य आणि राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी करणारे अभिजित बिचुकले कायम चर्चेत असतात. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघासाठी यंदा होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. प्रत्येक निवडणुकीत मी का हरतो, याचे उत्तर जनतेने द्यायला पाहिजे. मला माझा चाहतावर्ग कायम पाठिंबा देतो. पण, माझी चिकाटी पैसा आणि सत्तेच्या ताकदीपुढे कमी पडते. त्यामुळे आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये माझा पराभव झाला. पण, आता माझा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांनी गांभीर्याने विचार करावा. तरुणांच्या शिक्षण आणि नोकऱ्यांच्या मुद्द्यांना मी प्राधान्य देईन. मला मतदारांनी एकदा संधी देऊन पाहावी, असे आवाहन अभिजित बिचुकले यांनी केले.

यापूर्वी साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्याविरोधात अभिजित बिचुकले यांनी निवडणूक लढवली होती. तर अभिजित बिचुकले यांनी गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना आव्हान दिले होते. पण, त्यांचा शिवसेनेच्या झंझावातापुढे टिकाव लागला नाही. अभिजीत बिचुकले यांचे या निवडणुकीत डिपॉझिट जप्त झाले होते.

1 डिसेंबरला राज्यातील 5 पदवीधर मतदारसंघांच्या निडणुकांसाठी मतदान होणार असून आचारसंहिता लागू झाली आहे. 3 डिसेंबरला या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी विरोधात भाजप अशी जोरदार लढत होण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेत्या रुपाली पाटील यांना दिलेला शब्द पाळला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून राज ठाकरे यांनी मनसेकडून अ‌ॅड रुपाली पाटील-ठोंबरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रुपाली पाटील यांची उमेदवारी खुद्द राज ठाकरे यांनी जाहीर केली आहे. रुपाली पाटील या पक्ष स्थापनेपासून (14 वर्षांपासून) मनसेमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या निष्ठेचे आणि कामाचे फळ त्यांना मिळाले आहे.