पंजाबमधील काँग्रेसचे 26 आमदार ईडीच्या रडारावर


नवी दिल्ली – मोदी सरकारने संसदेत समंत करुन घेतलेल्या कृषि कायद्यांना विरोध केल्यामुळे पंजाबमधील काँग्रेस आमदारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चार वर्षांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा मुलगा रणइंदर यांच्या विरोधातील फाईल पुन्हा उघडल्यानंतर आता 26 आमदारांवर ईडीने लक्ष केंद्रीत केले आहे. काँग्रेसच्या या आमदारांवर ईडी मोठ्या कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

बेकायदा उत्खनन प्रकरणी या आमदारांना ईडी नोटीस पाठविण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून आमदारांपर्यंत ईडीची कारवाई होणार असल्याचे समजताच मोठी खळबळ उडाली आहे. ईडीला या कारवाईसाठी केंद्राची परवानगी मिळाली असल्यामुळे जालंधरमध्ये ईडीच्या दिल्लीतील बड्या अधिकाऱ्यांनी तळ ठोकला असून ईडीच्या ऑफिसमध्ये फाईल्स तपासण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ईडीच्या चौकशीची व्याप्ती वाढू लागली असून यामुळे मुख्यमंत्र्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल आणि भाजपवरही बेकायदा उत्खननाचा आरोप लागला आहे. पंजाब निवडणुकीवेळी मतदारांना कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आश्वासन दिले होते. बेकायदा उत्खनन करणाऱ्यांना तुरुंगात टाकले जाईल आणि खाण घोटाळ्यात जो महसूल बुडाला, तो वसूल केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते.

पण, सत्तेत काँग्रेस आल्यानंतर खाण घोटाळ्याचे आरोप अमरिंदर सरकारवरही होऊ लागले. पंजाबचे उर्जा मंत्री राणा गुरजीत सिंग यांना या प्रकरणात मंत्रिपदही सोडावे लागले. त्याचबरोबर जालंधरच्या शाहकोटचे आमदार लाडी शेरोवालिया यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आणि त्यांच्यावर झालेल्या एका स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. यानंतर खाण घोटाळ्याचे काँग्रेसच्या जवळपास दोन डझन आमदारांवर आरोप होऊ लागले.