तोच तो पणा टाळण्यासाठी

change
तंत्रज्ञानाने आपले जीवन आरामशीर केले आहे. परंतु त्या आरामातूनसुध्दा आपली एक विशिष्ट मानसिक अवस्था निर्माण झाली आहे. आपल्या मोबाईल फोनमध्ये अनेकांचे फोन नंबर साठवलेले असतात आणि त्यांना फोन करायचा झाला की आपण तो फोन नंबर ओपन करतो. पूर्वी तसे नव्हते. आपल्याला अनेकांचे फोन नंबर लक्षात ठेवावे लागत होते किंवा निदान वहीत लिहून ठेवून ते पुन्हा पाहून आपण तो फोन नंबर फिरवत होतो. त्यातून आपल्या मेंदूला एक व्यायाम होत होता. पण आता फोनच्या मेमरीने आपल्या मेंदूतली मेमरी क्षीण करून टाकली आहे. तिला आळशी केले आहे. अशी बरीच कामे नव्या तंत्रज्ञानाने केली असून आपल्या मेंदूला, शरीराला दुबळे करायला सुरूवात केली आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये एक रिकामेपणा यायला लागला आहे.

हळूहळू लोकांच्या असे लक्षात यायला लागले आहे की आपले आयुष्यातली बरीच गंमत तंत्रज्ञानाने हिरावून घेतली आहे आणि जीवन बोअर व्हायला लागले आहे. हा बोअरडम टाळण्यासाठी मानसशास्त्रज्ञ काही उपाय सांगत आहेत. आपल्या दिवसातला बराच वेळ मोबाईलकडे बघण्यातच वाया जातो. तेव्हा त्यातला थोडा वेळ कमी करून एखादा छंद जोपासला पाहिजे. किंवा एखाद्या जुन्या मित्राला फोन लावून त्याच्याशी जुन्या आठवणी काढून बोलले पाहिजे. त्यातून बोअरडम कमी होतो.

घरात एखादा कुत्रा किंवा मांजर पाळलेले असणे आणि त्याच्याशी काही वेळ खेळणे याच्यातूनसुध्दा आयुष्यातील कंटाळा कमी होतो. मन लावून छान जेवण करणे, एखाद्याा सहलीवर जाणे, जुने गाणे ऐकणे, नातलगांच्या विवाह समारंभात सहभागी होणे अशा कामांनीसुध्दा कंटाळवाणे टळू शकतो. आपल्या संस्कृतीमध्ये अनेक सणांची योजना केली आहे. आपल्याला त्या सणांचे काही वाटत नाही. परंतु यूरोप, अमेरिकेतल्या ज्या प्रगत लोकांना आयुष्याचा कंटाळा यायला लागला आहे त्यांना मात्र या सणांचे महत्त्व कळते. तेव्हा सणात आणि समारंभात सहभागी होणे हेसुध्दा आयुष्याचा तोच तो पणा कमी करण्यास उपयुक्त ठरते.

Leave a Comment