लक्षावधीची कमाई करून देणारे गाढव

sheru
घोडे, गाई, म्हशी, हत्तींना लाखो रूपये किंमती मोजल्या जातात हे आपल्याला माहिती आहे मात्र एका गाढवाला ३ लाख रूपयांची किंमत मोजण्याची तयारी दाखविली गेल्याचे कदाचित आपल्या माहितीत नसेल. इतकी मोठी किंमत मिळूनही मालक हे गाढव विकायला तयार नाही कारण या गाढवामुळे त्याला दर वर्षाला किमान अडीच ते तीन लाख रूपये उत्पन्न मिळते.

ही गोष्ट आहे पंजाबातील लेहरगागा गावाचा मोहिदरसिंग व त्याचे गाढव शेरू यांची. मोहिंदरने हे गाढव राजस्थानातील बिकानेर मधून २०१२ साली विकत आणले आहे.सामान्य गाढवांपेक्षा उंचीने अधिक व चांगलेच दटकट असलेल्या या गाढवाचा वापर घोड्यांबरोबर ब्रिडींगसाठी केला जात आहे व त्यातून पैदा होणारी खेचरे उत्तम जातीची निपजत आहेत. त्यामुळे या शेरू गाढवाची प्रसिद्धी आसपासच्या भागात झाली आहे. हरियाणा पंजाबच्या अन्य भागातून मोहिदरला शेरूला ब्रिडींग साठी घेऊन येण्याच्या अनेक ऑफर जत्रांदरम्यान येतात व प्रत्येक ब्रिडींगमागे मोहिंदर ५ हजार रूपये घेतो.

वर्षातले सहा महिने शेरू हे काम करतो व बाकीचे सहा महिने आराम. मोहिंदरही त्याची खूप काळजी घेतो. शेरूच्या रोजच्या आहारवर त्याला ४०० रूपये खर्च येतो शिवाय कामाच्या सहा महिन्यात जादा खूराक म्हणून शेरूला १० किलो साजुक तूप पाजले जाते असेही समजते. शेरूमुळे मोहिंदरला चांगली कमाई होते व म्हणूनच कितीही किंमत आली तरी मोहिदर शेरूला विकायला तयार नाही.

Leave a Comment