दिवाळीत का खेळतात जुगार?

dyut
भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सणाला कांही ना कांही परंपरा जोडली गेलेली आहे. त्यातील कांही परंपरा सकारात्मक संदेश देणार्‍या तर कांही नकारात्मक संदेश देणार्‍या आहेत. दिवाळीत जुगार अथवा द्यूत खेळण्याची परंपरा ही नकारात्मक संदेश देणारी मानली जाते. उत्तर भारतात पाडव्याच्या दिवशी जुगार खेळण्याची परंपरा आहे. द्यूत हे असे व्यसन आहे की माणूसच काय पण परमेश्वरालाही त्यामुळे भयंकर संकटांचा सामना करावा लागत असतो. दिवाळीच्या दिवशी शंकर पार्वती सारीपाट म्हणजे एक प्रकारचा द्यूत खेळतात म्हणून या दिवशी जुगार खेळण्याची परंपरा पडली आहे.

महाभारतातील नल दमयंतीच्या कथेतही राजा नलाला त्याच्या नातेवाईकांनी द्यूत खेळण्याचे आव्हान देऊन त्याचे राज्य, संपत्ती, सोनेनाणे, खजिना, राजपाट महाल, सेना सर्व त्याच्याकडून कपटाने जिंकून घेतले होते व नलाला त्याचे साम्राज्य परत मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला असे उल्लेख आहेत. महाभारतातच दुर्योधनाने व त्याचा मामा शकुनीनेही पांडवांना द्यूताचे आवाहन करून त्याचे इंद्रप्रस्थ राज्यच नाही तर पत्नी द्रौपदीही जिंकली होती. त्यानंतर त्यांना १२ वर्षांचा वनवास भोगावा लागला अशी कथा आहे. या द्यूताच्या वेडाने पांडवांचे सारे आयुष्यच बदलून गेले होते.

कृष्णाचा भाऊ बलराम यालाही द्यूत खेळल्यामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागल्याची कथा भागवतात आहे. हा द्यूत कालांतराने बदल होत गेला. प्रथम तो चौसर या नावाने लाकडी सोंगट्या पटावर ठेवून खेळला जात असे. त्यालाच सारीपाटही म्हणत. त्यानंतर चौपड या नावाने तो खेळला जाऊ लागला. त्यात कापडावर ६४ घरे असत व लाकडी सोंगट्यंानी तो खेळला जाई. त्यानंतर द्यूत हा लाकडी फासे टाकून खेळला जाऊ लागला या वेळेपर्यंत तो घराऐवजी बाजारात खेळला जात असे. हा पहिला कॅसिनो म्हणता येईल. त्यानंतर आता मात्र तो पत्त्यांच्या सहाय्याने खेळला जातो..

भारताच्या कांही भागात जुगार दिवाळीला खेळणे हे शुभ समजले जाते व त्यामुळे लक्ष्मीचे आगमन होते असा समज आहे.

Leave a Comment