इवलासा तीळ पण बहुगुणकारी


आपल्या पूर्वजांनी संक्रांतीला तीळ खाण्याचा सल्ला दिला आहे कारण संक्रांतीला हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागते. उन्हाळा सुरू झाला की, तहान वाढते आणि भूक कमी होते. अन्न कमी जाते. परिणामी ताकद कमी होते. पण संक्रांतीला तीळ खाल्ले असतील तर तिळामुळे शरीरात साचलेली चरबी यावेळी ऊर्जेच्या स्वरूपात कामाला येते. तसा तर दिवाळीलाच आपण हा साठा करायला सुरूवात केलेली असते कारण दिवाळीच्या फराळातली चकली, शंकरपाळे हे पदार्थ तेलकट आणि तळलेले असतात. उन्हाळा जवळ आल्यास तीळचज खायला का सांगितला आहे ? कारण तीळ सर्वात स्निग्ध असतात. तेलाचे प्रमाण तिळात सर्वात अधिक असतात.

म्हणून संक्रांतीला एकमेकांना तिळगूळ देता घेता भरपूर तीळ पोटात जातातच पण तिळाची पोळीही खाल्ली जाते. स्नान करताना अंगाला उटणेही तिळाचेच केलेले असते. असा अनेक मार्गांनी आपण तेल वापरत असतो. तिळाचा आणखी एक उपयोग आता लक्षात आला आहे. आपल्याला हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. अर्थात बदामाने तो वाढतोच पण बदाम फार महाग असतात. मात्र आता असे आढळून आले आहे की, बदामापेक्षा तीळ स्वस्तही असतो आणि रोज थोडे तीळ खाल्ल्यानेही हिमोग्लोबीन वाढत असते. तिळाची याबाबतची क्षमता बदामापेक्षा किती तरी म्हणजे जवळपास चौपटीने जास्त आहे. तीळ आरोग्यालाही चांगले असतात. वृद्धत्वाची प्रक्रिया रोखण्याचे सामर्थ्य तिळात आहे.

तिळात ओमेगा फॅटी ऍसिडस् मोठ्या प्रमाणावर असल्याने तिळाचा उपयोग केस वाढण्यास आणि त्वचा मुलायम होण्यास होत असतो. तिळाच्या वापराने त्वचा चमकदारही होत असते. तिळात रोगप्रतिकारक गुणही आहेत. त्वचेला अनेक प्रकारचे संसर्ग होत असतात. ते नकळतपणे होत असल्याने त्यांचे परिणाम लगेच आणि ठळकपणे जाणवत नाहीत मात्र असे लहान सहान आणि किरकोळ संसर्ग निष्प्रभ करून त्यांच्यापासून त्वचेचे संरक्षण करण्याचे काम तीळ करीत असतो. तिळ आणि डोक्याला लावण्याचे कोणतेही तेल मिसळून ते केसांच्या बुडाला लावल्यास केस आणि बुडाची त्वचा सक्षम होते आणि केस मजबूत होतात. तिळाचा वापर दातांच्या आरोग्यासाठी होतो. तोंडाचे विकारही तिळाने कमी होतात आणि तीळ खाल्ल्याने पचनशक्तीही सुधारते. असा आहे हा लहानसा तीळ पण त्याचे गुण मात्र महान आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment