केरळमधील या चार ठिकाणी अवश्य भेट द्या


कित्येक मैल अंतराचा सागरी किनारा, शांत, संथ बॅक वॉटर्स, आणि निर्सगाचा व वरुणराजाचा वरदहस्त लाभलेले केरळ, भारतातील सर्वांत प्रेक्षणीय राज्यांपैकी एक आहे. यंदाच्या दिवाळीच्या किंवा नाताळच्या सुट्ट्यांमध्ये केरळ ला फिरायला जायचा विचार असेल, तर केरळ मधील चार ठिकाणे आवर्जून पाहायला हवीत.

फोर्ट कोची या ठिकाणाला’ हेरीटेज साईट’ घोषित करण्यात आले आहे. येथील ज्युईश, पोतुगीझ आणि डच बांधणीच्या इमारती त्या त्या काळी तिथे वसलेल्या लोकांची आणि त्यांच्या जीवनशैलीची, परंपरेची ओळख करून देणाऱ्या आहेत. इथे निरनिराळ्या रेस्टॉरंट्सची, आर्ट गॅलरीज ची रेलचेल आहे. पुरातन वस्तूचा संग्रह करण्याची ज्यांना आवड असेल अश्यांकरिता अनेक अँटीक शॉप्स आहेत.

मुन्नार हे ठिकाण कोची पासून शंभर किलोमीटर च्या अंतरावर असून, ट्रेकिंग व ताज्या, उत्तम प्रतीच्या चहाचा अनुभव घ्यावयाचा झाल्यास येथे अवश्य जावे. येथे असणाऱ्या एराविकुलम नॅशनल पार्क ला भेट जरूर द्यावी. मुन्नार येथे असणाऱ्या चहाच्या अनेक बागांपैकी एका बागेला भेट देणे अगत्याचे आहे. ह्या ठिकाणी फिरण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय म्हणजे सायकल भाड्यावर घेऊन चहाच्या बागांचे सौंदर्य निरखीत फेरफटका मारणे, हा आहे.

केरळच्या वनराईचा आनंद लुटायचा असल्यास पेरियार अभयारण्यासारखे सुंदर ठिकाण नाही. इथे क्वचित वाघांचेही दर्शन होते. या अभयारण्यामध्ये मसाल्यांची झाडे असून, मसाल्याचे पदार्थ विकणारी दुकाने येथे आहेत. तसेच इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी कथकली आणि कलारीपयट्टू ची प्रात्याक्षिके दाखविली जातात. येथे नौकाविहार करण्याचीही सोय आहे. नौकाविहार करताना अनेक प्रजातींचे पक्षी, गवे आणि क्वचित हत्तीही नजरेस पडतात.

अलेप्पी येथील शांत , संथ बॅक वॉटर्स मधून नौकाविहार करण्याची मजा जरूर घ्यावी. इथे राहण्यासाठी अनेक हाऊसबोट्स ची सुविधा आहे. तुमच्या गरजेप्रमाणे हाऊसबोट निवडून त्यावर राहण्याचा आनंद जरूर घ्यावा.

Leave a Comment