भारतात आहे यमदेवाचे विश्वातील एकमेव मंदिर

yamraj
नरक चतुर्दशी दिवाळीच्या एक दिवस अगोदर असते. दक्षिण भारतात या सणाचे खूप महत्त्व आहे. यमदेवाचे स्मरण करून या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेला तांदुळाची रास मांडून त्यावर दिवा लावून ठेवला जातो. अकाल मृत्यू दूर ठेवण्यासाठी यमदेवाकडे प्रार्थना केल्यास घरामध्ये कोणाचाही अकाली मृत्यू होत नाही. यमाचा दिवस म्हणून या दिवसाला मानले जाते. यामुळे आम्ही तुम्हाला नरक चतुर्दशीच्या निमित्ताने यमदेवाच्या एका अनोख्या मंदिराची माहिती सांगणार आहोत.

हे मंदिर हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यातील भरमौर नावाच्या गावात असून एखाद्या घराप्रमाणे हे मंदिर दिसते. या मंदिराजवळ पोहचल्यानंतरही अनेक लोकांना मंदिरात जाण्याचे धाडस होत नाही. मंदिराच्या बाहेरूनच नमस्कार करून निघून जातात. कारण या मंदिरात धर्मराज यमदेव राहतात. या विश्वातील हे एकमेव मंदिर यमदेवाला समर्पित आहे. या मंदिरात एक खोली आहे, जी चित्रगुप्त देवाची मानली जाते. यमदेवाचे चित्रगुप्त सचिव आहेत. जीवात्म्यांच्या कर्माचा जे हिशोब ठेवतात.
yamraj1
येथील मान्यतेनुसार एखाद्या व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्या व्यक्तीचा आत्मा यमदेवाचे दूत सर्वात पहिले या मंदिरात चित्रगुप्तसमोर घेऊन येतात. या जीवात्म्याला चित्रगुप्त त्याच्या पूर्ण कर्माची माहिती देतात आणि त्यानंतर चित्रगुप्त देवाच्या खोलीतून यमदेवाच्या खोलीत त्याला नेले जाते. यमदेवाचे न्यायालय असे या खोलीला म्हटले जाते. यमदेव याठिकाणी व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात.

सोने, तांब, चांदी आणि लोखंडाचे चार अदृश्य दरवाजे या मंदिरात असल्याचे मानले जाते. यमदेवाने आदेश दिल्यानंतर दूत याच दरवाजांमधून आत्म्याला स्वर्ग किंवा नरकात घेऊन जातात. गरुड पुराणातही यमदेवाच्या दरबारात चार दरवाजे असल्याचा उल्लेख आहे.

Leave a Comment