या मंदिरांमध्ये होते देवतांबरोबरच कुत्र्यांचीही पूजा


आपण देवी देवतांची मंदिरे तर पुष्कळ पाहिली असतील, पण भारतामध्ये काही मंदिरे अशी आहेत जिथे देवी देवतांची नाही, तर कुत्र्यांची पूजा होत असते. ह्या मंदिरांमध्ये पूजेसाठी येणाऱ्या भाविकांची कुक्कुर-पूजेवर मनापासून श्रद्धा आहे. येथे हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. ह्या मंदिरांशी निगडित अनेक आख्यायिकाही प्रसिद्ध आहेत. अश्या मंदिरांपैकी एक आहे बुलंदशहर जवळील मंदिर. हे मंदिर बुलंदशहर पासून पंधरा किलोमीटर अंतरावर सिकंदराबाद नामक औद्योगिक वसाहतीमध्ये आहे. हेमंदिर सुमारे शंभर वर्षे जुने आहे. ह्या मंदिरामध्ये कुत्र्याच्या समाधीची पूजा केली जाते. होळी, दिवाळीच्या दिवसांमध्ये ह्या ठिकाणी मोठी जत्रा भरते. तसेच श्रावणामध्ये आणि नवरात्रीला येथे अन्नछत्र चालविले जात असते. येथे येणाऱ्या भाविकाने ह्या कुत्र्याच्या समाधीचे दर्शन घेऊन श्रद्धेने केलेली प्रार्थना सफल होते असे म्हणतात. ह्या मंदिराशी निगडित आख्यायिकाही मोठी रोचक आहे.

असे म्हणतात, की सुमारे शंभर वर्षांपूर्वी येथे लटूरिया बाबा नामक अंध संत रहात असत. त्यांच्यासोबत त्यांचा पाळीव कुत्रा ही रहात असे. ह्या बाबांना अनेक सिद्धी अवगत होत्या. बाबांचा देहांत झाल्यानंतर त्यांच्या इमानी कुत्र्यानेही प्राण त्यागले. बाबांनी मृत्यूपूर्वी आपल्याआधी ह्या कुत्र्याची देखील पूजा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हापासून ह्या कुत्र्याच्या समाधीची पूजा करण्याचा प्रघात पडला.

उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या जवळ असलेल्या चीपियाना गावातील भैरव मंदिर हे येथील कुत्र्याच्या समाधीकारिता प्रसिद्ध आहे. ह्या समाधीचे दर्शन घेण्याकरिताही अनेक भाविक येत असतात. ह्या समाधीजवळ एक पाण्याचा हौद बनलेला आहे. ह्या हौदातील पाण्याने स्नान केल्याने रेबीजची व्याधी, माकड चावल्याने झालेली जखम, किंवा काही कारणाने त्वचेवर आलेले फोड बरे होतात असे म्हणतात. येथे असेलल्या कुत्र्याच्या समाधीला प्रसादाचा नैवेद्य दाखवून हा प्रसाद इतर भाविकांना देण्याची पद्धत येथे रूढ आहे. येथे ज्या कुत्र्याची समाधी आहे, तो कुत्रा कालभैरवाचे वाहन असल्याची आख्यायिका येथे प्रसिद्ध आहे. ही समाधी लक्खा नामक एका भिल्लाने, शंभर वर्षांपूर्वी बनविली असल्याचे म्हणतात.

कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यामध्ये चिन्नपटना गावामध्येही कुत्र्याचे मंदिर बनलेले आहे. कुत्रा हे जनावर अतिशय इमानी असून, आपल्या मालकाच्या परिवाराला कोणत्याही आपत्ती पासून वाचविणारा हा प्राणी आहे. तसेच कोणतीही मैसार्गिक आपत्ती येणार असेल तर त्याची जाणीव कुत्र्याला खूप आधीपासूनच होऊ लागते. ह्याच भावनेला स्मरून चिन्नपटना ह्या ठिकाणी कुत्र्याचे मंदिर बनविण्यात आले आहे. येथे कुत्र्यांच्या दोन मूर्ती असून, दररोज ह्या मूर्तींची पूजा होत असते. माणसाच्या प्रती कुत्र्याच्या इमानदारीचे प्रतिक म्हणून ह्या मंदिराचे निर्माण करविले गेले होते. त्याचप्रमाणे झांसी आणि छत्तीसगढ मधील दुर्ग जिल्ह्यातील खापरी गावांमध्येही कुत्र्यांची मंदिरे आहेत.

Leave a Comment