भोपाळमध्ये आजही वापरात आहे तीनशे वर्षे जुने ‘हम्माम’


‘हम्माम’ ह्या अरेबिक शब्दाचा अर्थ ‘उष्णता पसरविणारा’ असा आहे. हम्माम म्हणजे खास ‘स्टीम रूम’ असणारी सार्वजनिक स्नानगृहे. ह्या स्नानगृहांची पद्धत अनेक शतकांपूर्वी मध्य आशियायी देशांमध्ये अस्तिवात होती. ह्या ठिकाणी लोक केवळ स्नानासाठीच नाही, तर एकमेकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी, किंवा थकवा दूर होऊन आराम मिळावा ह्या उद्देशाने येत असत. क्वचित कधी तरी काही सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांच्या करिता देखील लोक हम्माममध्ये एकत्र येत असत. ह्या स्नानगृहामध्ये स्नानासाठी गरम पाणी, व स्टीम रूम असे. तसेच मालिश करून देण्याकरिता खास प्रशिक्षित लोक ही येथे जनतेच्या सेवेकरिता तत्पर असत. ‘अल कानून’ नामक इब्न-ए-सीना ह्यांनी ख्रिस्तपूर्व १००० साली लिहिलेल्या ग्रंथामध्येही हम्मामचा उल्लेख आहे. योग्य हम्मामच्या मदतीने मनुष्याच्या शरीरातील सारा थकवा, मरगळ निघून जाऊन, शरीरामध्ये पुन्हा चैतन्य, उत्साह निर्माण होत असल्याचा उल्लेख ह्या ग्रंथामध्ये आहे. भारतामध्येही अनेक ठिकाणी हम्माम किंवा ‘टर्किश बाथ’ असल्याचा उल्लेख इतिहासामध्ये आहे. दिल्लीच्या सल्तनातीत आणि मुघल साम्राज्यामध्ये हम्मामला मोठे महत्वाचे स्थान होते. शाही हम्मामचा वापर स्नान, ब्युटी थेरपीज, आणि विश्रांती घेण्याकरिता होत असे.

आजही भोपाळ येथे ‘हम्माम-ऐ-कदमी’ ह्या नावाने पारंपारिक हम्माम किंवा ‘टर्किश बाथ’ पाहायला मिळते. प्राचीन काळी टर्कीमध्ये बांधल्या गेलेल्या हम्मामच्या वास्तूरचनेवर ह्या हम्मामची रचना आधारित आहे. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला नवाब दोस्त मोहम्मद खान ह्यांनी ह्या हम्मामचे निर्माण करविले होते. भारत आणि भारताच्या आसपासच्या देशांमधले, आजच्या काळामध्येही वापरात असलेले हे एकमेव हम्माम आहे. त्यानंतर नवाब मोहम्मद खान ह्यांनी हे हम्माम त्यांचे विश्वासू सेवक हज्जाम हम्मू खलिदा ह्यांना भेट म्हणून दिले. ह्यांचे वंशज आजही हे हम्माम चालवीत आहेत. त्याकाळी बहुतेक हम्माम हे स्थानिक मशिदींच्या जवळ बांधले जात असत. उद्देश हा, की मशिदीमध्ये प्रार्थनेसाठी जात असताना भाविकांना स्नान करून जाता येणे शक्य व्हावे. ही परंपरा अनुसरून हे हम्माम देखील मशिदीच्या जवळ बांधले आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाला अतिशय अनुभवी, प्रशिक्षित लोकांकडून मालिश करवून घेता येते.

स्थानिक तेले, आणि औषधी ह्यांचे मिश्रण करून अनेक तऱ्हेचे ‘स्क्रब्स’ मालिश करिता वापरले जातात. मालिश करून देणाऱ्या लोकांच्या मागील पाच पिढ्या देखील ह्याच ठिकाणी हेच काम करीत होत्या. ह्या सार्वजनिक स्नानगृहामध्ये अनेक लहान कक्ष आहेत. मुख्य ‘स्टीम रूम’ एक मोठा कक्ष असून, येथे लाकडे जाळून प्रचंड मोठ्या तांब्याच्या हंड्यातील पाणी तापविले जाते, आणि त्याची वाफ निरनिरळ्या पाईप्सच्या द्वारे ह्या ‘स्टीम रूम’ मध्ये येते. प्राचीन इतिहास असणारे हे हम्माम त्या काळचे ‘स्पा’ म्हणता येईल. आजही भोपाळमधील हे हम्माम वापरामध्ये असून, लोक येथे आवर्जून येत असतात. ह्या हम्माममधील स्नान खासकरून सांधेदुखी आणि दम्याच्या रुग्णांसाठी विशेष फायद्याचे असल्याचे म्हटले जाते. हे हम्माम दरवर्षी दिवाळीच्या सुमाराला खुले होते आणि होळीपर्यंत सुरु असते.

Leave a Comment