रंग बदलणाऱ्या झालरी…


दरवर्षी आनंदाचं उधाण घेऊन येणारी ही दिवाळी नवचैतन्यदायी असते. हे चैतन्य प्रत्येक क्षेत्रात दिसून येतं. दिवाळी म्हणजे प्रकाशाचं, रंगांचं, नवतेजाचं पर्व. या दिवसात बाजारात विशेष बहार पहायला मिळते. यंदाही बाजार नानाविध वस्तूंनी सजला आहे. काही नाविन्यपूर्ण उत्पादने ग्राहकांना आकर्षित करीत आहेत.

दिवाळीत घराच्या सजावटीला विशेष महत्त्व असते. नाविन्यपूर्ण सजावट घराच्या सौंदर्यास चार चांद लावते. यंदा बाजारात सजावट सामानात अनेक नवीन प्रकार आले आहेत. रंग बदलणाऱ्या झालरी हा असाच एक ट्रेंडी प्रकार आहे.

पडद्यासारखी वापरली जाणारी ही झालर रिमोटद्वारे उघडणारी आहे. अवघ्या 2850 रुपयांमध्ये उपलब्ध असणारा हा नवीन प्रकार रंगही बदलतो. या रिमोटवर वेगवेगळ्या रंगांची बटनं दिली असून ज्या रंगाचं बटन दाबलं जाईल त्याप्रमाणे झालरचा रंग बदलतो.

हा रिमोट डीव्हीडी प्लेअरसारखा आहे. ही तलम झालर एलईडी लाईट्‌सच्या मदतीने बनवली गेली असून रंग बदलत असल्यामुळे घरातील रंगसंगतीशी जुळवून घेण्यासाठी त्याचप्रमाणे आकर्षक सजावटीसाठी तिचा उत्तम उपयोग करुन घेता येईल.

बाजारातला आणखी एक नवीन प्रकार म्हणजे लेजर लाईट डिव्हाइस. 1750 रुपयांमध्ये उपलब्ध असणाऱ्या या उपकरणातून लेजर लाईट्‌स निघतात. हिरव्या, निळ्या, लाल, पिवळ्या रंगांचे हे प्रकाशझोत घराचा माहोल बदलून टाकतात.

मास्टर रिमोटद्वारे नियंत्रित होणाऱ्या लाईटच्या रंगीबेरंगी माळादेखील बाजाराचं आकर्षण ठरत आहेत. या माळांमध्ये आठ प्रकारची कॉम्बिनेशन्स करता येतात. इन वेव्ह, स्लो-स्लो, चेजिंग फ्लॅश, स्लो फेड, ट्विंकल फ्लॅश अशा ट्रेंडी नावांनिशी कॉम्बिनेशन्स बदलतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकाशयोजनेचा आनंद लुटता येतो.

Leave a Comment