रुरकी मध्ये सुरु होतेय महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अकादमी

उच्च तंत्रज्ञान शिक्षण संस्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तराखंड राज्यातील रुरकी येथे पुढच्या महिन्यात महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अकादमी सुरु होत आहे. येथे वयाच्या सहाव्या वर्षापासून होतकरू खेळाडू क्रिकेट प्रशिक्षण घेऊ शकणार असून त्यांना धोनी कडून खेळातील कौशल्ये शिकण्याची संधी मिळणार आहे. उत्तराखंड राज्यात सुरु होत असलेल्या या अकादमीचे उद्घाटन ३ डिसेंबर रोजी होणार आहे. याच दिवसापासून प्रशिक्षणाची सुरवात केली जाणार आहे. त्यासाठी नोंदणी सुरु झाली आहे.

या संदर्भात माहिती देताना अकादमीचे प्रबंधक मिलिंद दिवाकर म्हणाले, लहान शहरातून, गावातून क्रिकेट साठी चांगले प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करून देण्याच्या उदेशाने अकादमी स्थापन केल्या जात असून त्या मालिकेतील ही ३५ वी अकादमी आहे. वयाच्या सहाव्या वर्षीपासून येथे प्रशिक्षण दिले जाणार आहेच पण आर्थिक कारणांमुळे ज्यांना प्रशिक्षण घेता येत नाही अश्या गुणी खेळाडूंना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

अकादमीचे संचालक अंकित मेहन्दिना म्हणाले, उत्तराखंड राज्याचा खेळाडू ऋषभ पंत हे आजचे उत्तम उदाहरण आहे. पंत सारख्या प्रतिभावान खेळाडू प्रमाणेच रूडकी येथे प्रतिभावान खेळाडू तयार व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यांनी राज्याचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे अशी अपेक्षा असून येथे येणारया मुलांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे.