माणसे गायब करणारा किल्ला- कुन्धार गड

फोटो साभार मल्हार

भारतात अश्या अनेक वास्तू आहेत ज्या रहस्यमयी मानल्या जातात. त्यामुळे पर्यटकांसाठी अशी ठिकाणे विशेष आकर्षणाचे स्थान ठरतात. उत्तरप्रदेशातील झाशी पासून ७० किमीवर असलेला कुन्धार किल्ला याच यादीत मोडतो. या किल्ल्यामध्ये माणसे गायब होतात असे सांगितले जाते. या मागचे रहस्य आजही उलगडलेले नाही. या किल्ल्याचे बांधकाम निम्मे जमिनीवर आणि निम्मे जमिनीखाली आहे. अतिशय कुशलतेने हा गड बांधला गेला आहे. १५०० ते २००० वर्षापूर्वी हा गड बांधला गेला असे मानले जाते. बुंदेल, चंदेल शासकांनी या किल्ल्यावर राज्य केले होते.

या किल्ल्याची इमारत पाच मजली आहे पैकी दोन मजले जमिनीखाली आहेत आणि तीन मजले जमिनीवर आहेत. चार पाच किलोमीटर वरून पाहिले तर किल्ला दिसतो आपण जसजसे जवळ जातो तसा तो दिसेनासा होतो. किल्ल्याचा रस्ता पकडून माणूस जात राहिला तर भलतीकडेच पोहोचतो असा अनुभव सांगितला जातो. किल्ल्याच्या सुरक्षेसाठी असे भूलविणारे बांधकाम केले गेले असावे.

असेही सांगतात की या किल्लाजवळ असलेल्या एका गावात लग्न होते. लग्नाला आलेले ५०-६० वऱ्हाडी किल्ल्यात गेले पण ते गायब झाले आणि नंतर त्याच्या कधीही तपास लागला नाही. अश्या अनेक घटना येथे घडल्या आहेत. किल्ल्यात भूलभुलैया मार्ग असल्यामुळे असे घडत असावे असा तर्क केला जातो. येथे दिवसासुद्धा अंधार असतो त्यामुळे भीती वाटते. या किल्ल्यात सोने हिरे असा मौल्यवान खजिना असल्याच्या कथा आहेत. मात्र हा खजिना शोधून काढणे अजून कुणालाही शक्य झालेले नाही.