स्वस्त आणि मस्त फर्निचर बाजार


दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक घरात कांही ना कांही नवीन खरेदी केली जात असते. कधी ही खरेदी दागदागिन्यांची असते, वाहनांची असते तर कधी घरासाठी आवश्यक असणार्‍या वस्तूंची असते. घर म्हटले म्हणजे फर्निचर हवेच. किमान चार खुर्च्या, कपाटे, बेड इतके तरी फर्निचर लागतेच. फर्निचर विकणारी अनेक दुकाने प्रत्येक गावात असतात. मात्र स्वस्त आणि मस्त फर्निचरसाठी प्रसिद्ध असलेल्या काही बाजारांची माहिती माझा पेपरच्या वाचकांसाठी


पुण्यासारख्या ठिकाणी आपण रहात असलात, तर बाजीराव रोड वरील फर्निचर दुकानांना आवर्जून भेट द्या. या दुकानातून सर्व प्रकारचे फर्निचर मिळते तेही ब्रँडेड फर्निचरच्या अर्ध्या किमतीत. शिवाय आपल्या घरात जशी जागा असेल त्यानुसार येथे आपल्याला फर्निचर तयारही करून दिले जाते. बेडस, कपाटे, डायनिंग टेबले, शोकेस, टी पॉय, इ्रेसिंग टेबल असे सर्व प्रकारचे फर्निचर येथे रास्त दरात मिळते.


राजधानी दिल्लीत आपले वास्तव्य असेल तर पंचकुई मार्केट या नावाचा फर्निचरचा होलसेल बाजार आपण पालथा घालू शकता. येथेही सोफयापासून लहान छोट्या कपाटांपर्यंत सर्व खोल्यांसाठी उपयुक्त असणारे सर्व प्रकारचे फर्निचर मिळते. या भागात फर्निचरची सुमारे १ हजारांहून अधिक दुकाने आहेत आणि येथे फर्निचर तयार करणार्‍यांची संख्या अधिक आहे त्यामुळे येथे रिटेल दुकानातून मिळणार्‍या फर्निचरच्या किंमतीच्या अर्ध्या किंमतीत चांगले फर्निचर आपण खरेदी करू शकतो. हा बाजार नेहमीच गजबजलेला असतो.


दिल्लीतच आणखी एक फर्निचर बाजार आहे तो म्हणजे कीर्तीनगर बाजार. हे देशातील सर्वात मोठे फर्निचर मार्केट आहे. येथेही सुमारे दोन हजारांहून अधिक दुकाने आहेत आणि तेथे घरासाठी, कार्यालयासाठी लागणारे सर्व फर्निचर मिळते. येथे ही फर्निचर उत्पादकांची दुकाने आहेत त्यामुळे बाजारभावापेक्षा ३० ते ४० टक्के कमी दरात येथे फर्निचर खरेदी करता येते.


मुंबईत आपण रहात असाल व आपल्याला नुसते फर्निचरच नाही तर त्यासोबत घरसजावटीसाठी अँटीक्स, घड्याळे असेही सामान खरेदी करायचे असेल तर महमदअली रोडवरचा चोर बाजार गाठायला हवा.याला चोर बाजार म्हटले जात असले तरी मुळातला तो शोरबाजार आहे. १५० वर्षे जुना हा बाजार त्याकाळी विक्रेते जोरजोरात ओरडून माल विकत असत म्हणून शोरबाजार होता. त्याचा अपभ्रंश चोरबाजार झाला आहे. येथे सेकंड हँड कपडे तसेच जुने वापरलेले फर्निचर, अनेक प्रकारच्या अँटीक वस्तू खरोखरच सुंदर मिळतात. पण येथे जाताना घासाघीस करण्याची तयारी ठेवायला हवी तसेच आपला खिसा सांभाळायला हवा. अन्यथा या चोरबाजारात आपला खिसा कधी कापला गेला हे तुम्हाला समजणारही नाही.


दिल्लीजवळ गुडगाव येथील फर्निचर बाजारही खूप प्रसिद्ध आहे. येथेही नवे जुने सर्व प्रकारचे फर्निचर मिळते. फॅब इंडिया अथवा होमसेंटरप्रमाणे येथे फर्निचर मिळते तेही या ब्रँडेड फर्निचरच्या निम्म्या दरात.

Leave a Comment