पुण्याजवळचे पाच सुंदर ट्रेकींग स्पॉटस


पावसाळा सरत आला आहे आणि डोंगरदर्‍यांनी आता हिरवेगार शालू नेसले आहेत. विविध प्रकारच्या रानफुलांची नक्षी त्यावर काढली गेली आहे. छान गार हवा, मधूनमधून पावसाची रिमझिम व चहुबाजूंनी वेढून घेणारी हिरवाई अशा वातावरणात भटकंती करायची मजा कांही औरच. ट्रेकींग प्रेमी अशा वातावरणात हमखास नवनवे ट्रेकींग चे मार्ग धुडाळत असतात. दिवाळी जवळ आली आहे व लागून सुट्यांची संधीही त्यामुळे उपलब्ध आहे. अशा वेळी १-२ दिवसांत करता येणारे ट्रेक नवा हुरूप द्यायला खूपच महत्त्वाचे ठरतात.

पुण्याजवळ अशी अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. येथे ट्रेकींग ची मजा लुटता येईलच पण साहसाची संधीही मिळेल. पुण्याजवळ असलेला राजमाची किल्ला त्या दृष्टीने अगदी नवीन ट्रेकींग करणार्‍यांसाठीही उत्तम. लोणावळ्या जवळ असलेल्या राजमाची किल्ला चढणीला अगदी सोपा आहे. केवळ ४० मिनिटात राजमाचीवर पोहोचता येते. शिरोटा बांध राजमाचीच्या सौंदर्यात आणखी भर घालतो. येथे दोन गुहा आहेत.


विसापूर हा लोहगड जवळचा गड ट्रेकींग साठी अगदी मस्तच. अर्थात चढाईला थोडा अवघड असला तरी मान्सूनच्या दिवसांत तो अगदी सुंदर रूपडे घेऊन नटलेला असतो. वाटेत अनेक झरे दिसतात पण पावसाळ्यात नवनवे धबधबेही येथे तयार होतात. त्यामुळे हा मार्ग आणखीनच मोहक बनतो.


हरिश्चंद्रगड हा ट्रेक थोडा कठीण म्हणता येईल. म्हणजे एखादा मुक्काम टाकण्याच्या दृष्टीने तो करावा. पुण्यापासून ११८ किमी वर हा डेांगरी किल्ला आहे. ट्रेकर्स पाच वेगवेगळ्या मार्गाने या किल्ल्यावर चढतात. हा प्रवास थोडा दीर्घ आहे पण तितकाच रोमांचकारीही. वर पोहोचल्यावर आजूबाजूच्या परिसराचे दर्शन सारा शीण क्षणात घालविते. येथे शिवमंदिर, कोकणकडा आहे. येथील गुहात राहता येते. सुंदर खळाळते धबधबे मनाचा शीण हलका करतात.


राजगड ही आपल्या शिवाजी महाराजांची पहिली राजधानी. पुण्यापासून ५० किमीवर असलेल्या या डोंगरी किल्ल्यावर बालेकिल्ला व कुंड ही प्रमुख आकर्षणे. येथे ट्रेकर्सची नेहमीच गर्दी असते. पावसाळ्याच्या दिवसांत हा ट्रेक आणखी आनंददायी ठरतो. येथे दारूगोळा कोठाराचे अवशेष आहेत.


सिंहगड हा पुण्यापासून अगदीच जवळ असलेला डोंगरी किल्ला सर्वात लेाकप्रिय स्थळ आहे. या गडावर जाण्यासाठी रस्ताही आहे मात्र ट्रेकींग करणारे डोंगर चढून वर जाणेच पसंत करतात. तानाजी मालुसरे यांनी याच गडावर रात्रीत हल्ला करून महाराजांना गड जिंकून दिला होता. त्यासाठी प्राण त्यागले होते. येथे तानाजी व शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र राजाराम याची स्मारके आहेत. येथील देवटाक्याचे पाणी अतिनिर्मळ व थंडगार असते. वाटेत चढताना थंडगार ताक, दही विपुल प्रमाणात मिळते तसेच वर गेल्यानंतर पिठल भाकरी, गरमागरम भजी, कणसे असे अस्सल मराठमोळे खाद्यपदार्थही भूक भागविण्यासाठी सज्ज असतात.

Leave a Comment