व्हॉट्सअॅपच्या नव्या फीचरमुळे आपोआप डिलीट होणार मेसेज


आपले बहुप्रतिक्षीत Disappearing Messages फीचर प्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने अधिकृतपणे लाँच करत असल्याची घोषणा केली आहे. याच महिन्यात एक अपडेट द्वारे हे फीचर जगभरात लाँच करण्यात येणार आहे. युजर्संना या फीचरद्वारे मोठा दिलासा मिळणार आहे. आता नको असलेले मेसेज डिलिट करण्याची गरज भासणार नाही. आता पाठवण्यात आलेले मेसेज ७ दिवसानंतर आपोआप डिलीट होणार आहेत. स्नॅपचॅट, टेलिग्राम आणि सिग्नल यासारख्या प्रसिद्ध अॅप्समध्ये यासारखे हे फीचर आधीच दिसलेले आहे.

गुरुवारी डिसअपियरिंग मेसेजस फीचरला कंपनीने रोल आउट करणे सुरू केले आहे. सर्व डिव्हाइसपर्यंत या महिन्याच्या अखेर पर्यंत पोहोचवले जाईल. हे फिचर अँड्रॉईड, आयओएस, लिनक्स आधारित KaiOS आणि व्हॉट्सअॅप वेब व्हर्जनवर उपलब्ध आहे. नुकतीच या संदर्भात व्हॉट्सअॅपने अशी माहिती दिली की, Disappearing Messages फीचर ला कशा प्रकारे इनेबल किंवा डिसेबल करावे लागणार आहे.

टेलिग्राम पेक्षा व्हॉट्सअॅपचे हे फीचर वेगळे आहे. किती दिवसांत मेसेज गायब करायचे ते टेलिग्राम युजर्स ठरवतात. तर व्हॉट्सअॅपवरील मेसेज स्वतःहून ७ दिवसांनंतर गायब होतील. तसेच स्नॅपचॅटमध्ये रिसिवरमध्ये मेसेज पाहिल्यानंतर तात्काळ गायब होतात. यासंदर्भात माहिती देताना व्हॉट्सअॅपने सांगितले की, युजर्संना मेसेज गायब होण्याआधी त्यावर चर्चा करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी ७ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

प्रत्येक चॅट विंडो, मग तो वैयक्तिक असो किंवा ग्रुप चॅटसाठी या फीचरला वेगळे इनेबल करावे लागणार आहे. यासाठी चॅटच्या नावावर क्लिक करावे लागेल. त्या ठिकाणी ऑप्शन निवडावा लागेल. एनेबल केल्यानंतर युजर्सचे सर्व नवीन मेसेज ७ दिवसांनंतर गायब होतील.