तिकीट बुकिंग करण्यासाठीचे नियम IRCTC ने बदलले!


नवी दिल्लीः देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्यापही कायम असून त्या पार्श्वभूमीवर मागील अनेक महिन्यांपासून देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. पण देश आता पुन्हा एकदा हळूहळू अनलॉक होत असून, देशातील नागरिकांचे जनजीवन हळूहळू रुळावर येत आहे. विशेष म्हणजे कोरोना काळातही रेल्वे मंत्रालयाने नागरिकांच्या सुविधेसाठी अनेक ट्रेन सोडल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची खबरदारी देखील घेतली जात आहे. त्यातच आता तिकीट बुकिंगसाठी नवीन नियम इंडियन रेल्वे कॅटेरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) लागू केला आहे. IRCTCने कोरोनाच्या संकटामुळे नियमांमध्ये काही बदल केले आहेत.

आता IRCTC ने असा निर्णय घेतला आहे की, ट्रेन सुटण्याच्या 30 मिनिटे आधी दुसरा रिझर्व्हेशन चार्ट तयार केला जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून ट्रेनमध्ये बर्थ बुक केलेल्या प्रवाशांना सूचित करण्यासाठी दुसरा चार्ट दोन तासांपूर्वी तयार केला जात होता. IRCTC कोरोना संकटाच्या पूर्वी रेल्वे सुटण्यापूर्वी चार तास आधी पहिला चार्ट प्रसिद्ध करीत होती. पण आता उर्वरित जागांच्या बुकिंगसाठी, प्रवासी आरक्षण सुटण्याच्या 30 मिनिटांपूर्वीच प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) काउंटरकडे जाऊ शकणार आहे. त्याचबरोबर दुसरा रिझर्व्हेशन चार्ट तयार होण्यापूर्वी प्रवाशांना आसन ऑनलाईन बुक करू शकता येणार आहे. प्रथम बुक करणाऱ्याला प्राधान्य दिले जाणार असून, त्याआधारे जागा वाटप करण्यात येणार आहे.

यासंदर्भात विभागीय रेल्वेने विनंती केली की, दुसरा रिझर्व्हेशन चार्ट गाड्या सुटण्याच्या 30 मिनिटांपूर्वी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय प्रवाशांच्या सोयीसाठी घेतला गेला आहे. भारतीय रेल्वेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेल्वे सुटण्यापूर्वी 30 मिनिटे ते 5 मिनिटांपूर्वी दुसरे रिझर्व्हेशन चार्ट तयार करण्यात येणार आहे. परताव्याच्या तरतुदीनुसार या कालावधीत आरक्षित तिकिटे रद्द करण्याची परवानगी होती. यामुळे ट्रेनमधून प्रवास करणा-या प्रवाशांना दिलासा मिळाला, कारण शेवटच्या क्षणी योजना बदलल्यासही ते तिकीट रद्द करू शकतात आणि परतावा मिळवू शकतात.

केंद्र सरकारने रेल्वे माहिती प्रणालीत (CRIS) 10 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमधील नवीन तरतुदी पूर्ववत करण्यासाठी आवश्यक बदल केले असल्याचे रेल्वे मंत्रालयाने सांगितले. आयआरसीटीसी ई-बुकिंगचे नियम कायम असून रेल्वे अधिका-याच्या म्हणण्यानुसार प्रवाशांनी रेल्वे सुटण्यापूर्वी एक-दोन तास आधी रेल्वे स्टेशनवर पोहोचणे अपेक्षित आहे.

भारतीय रेल्वे खात्याने रेल्वे तिकिटांच्या ऑनलाइन बुकिंगला अधिक सोपे करण्यासाठी अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे प्रवाशांना अनेक सुविधांचा उपयोग घेता येणार आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत रेल्वेची अधिकृत वेबसाईट इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिजम कॉर्पोरेशनने (IRCTC) अधिक यूजर फ्रेंडली केले आहे. सोपे डिझाईन आणि नव्या फीचर्समुळे आता वेबसाईटवर (www.irctc.co.in) सहजपणे ‘ट्रेन तिकिट’ उपलब्धतेचा पर्याय देण्यात आला आहे. यासाठी यूजर्सला वेबसाईटवर लॉगिन करण्याची आवश्यकता नाही.