७ प्रकारचे कॅन्सर तंबाखूमुळे होतात

cancer
बार्शी : तंबाखूमुळे कॅन्सर नव्हे तर अन्न पचन होते असा नवा शोध खासदार दिलीप गांधीनी लावल्यामुळे सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. परंतु बार्शीतील कॅन्सर हॉपिस्टलने गेल्या वर्षापासून तंबाखूमुळे ७ प्रकारचे कँन्सर होतात असे संशोधन केले आहे.

कँन्सर झालेले ३९ टक्के रुग्ण मृत्युमुखी पडतात. यामध्ये तंबाखूजन्य गुटखा-माव्यामुळे कॅन्सर होणा-या १८ ते ३५ वयोगटातल्या तरुणांची संख्या वेगाने वाढत आहे. भारतातले सर्वात मोठे ग्रामीण कॅन्सर संशोधन आणि उपचार केंद्र महाराष्ट्रात आहे. त्या संस्थेने ही माहिती केंद्र सरकारला दिली आहे. डॉक्टर भगवान नेने हॉस्पिटलचे संस्थापक. डॉ. नेनेंच्या टीमने तंबाखूमुळे होणा-या कॅन्सरची माहिती १९९८ पासून संकलित केली आहे. ही माहितीच खासदार दिलीप गांधी यांचे अज्ञान दुर करण्यासाठी पुरेशी आहे.

खासदार दिलीप गांधींच्या अहमदनगरपासून २२५ किलोमीटर अंतरावर, बार्शीत भारतातले हे सर्वात मोठे ग्रामीण कॅन्सर हॉस्पिटल आहे. साडेसात एकर विस्तृत जमिनीवर वसलेल्या हॉस्पिटलमध्ये ४०० कर्मचारी काम करतात. जागतिक पातळीवर कॅन्सरवर संशोधन आणि उपचार करणारं हॉस्पिटल अशी याची ख्याती आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर बार्शीच्या डाँ. भगवान नेनेंना मान-सन्मान आहे. जागतिक आरोग्य संघटना नेनेंच्या कॅन्सर हॉस्पिटलला संशोधन प्रमाण मानते. त्यामागे डॉक्टरांच्या ५० वर्षांची सेवा आहे. त्यामुळे खासदारांसह सामान्य जनतेने यातून धडा घेतल्यास तंबाखू सेवनाचे प्रमाण आटोक्यात आणण्यास हातभारच लागेल.

बार्शीमध्ये दाखल होणा-या कॅन्सर पेशंटपैकी २३ टक्के तंबाखूमुळे कॅन्सर झालेले आहेत. १९९८ साली एक लाखात ३ टक्के पुरुषांना, म्हणजे सुमारे ३ हजार जणांना तोंडाचा कँन्सर व्हायचा २०११ मध्ये हे प्रमाण पुरुषांमध्ये ११ टक्के, तर महिलांमध्ये २ टक्के इतके झाले. तंबाखूमुळे स्वरयंत्राचा कॅन्सर होण्याचे प्रमाण १९९८ मध्ये पुरुषांत ५ टक्के होते, २०११ मध्ये २ टक्क्यांवर आले. १९९८ मध्ये ६ टक्के पुरुषांना तंबाखूमुळे अन्ननलिकेचा कॅन्सर व्हायचा, २०११ मध्ये हे प्रमाण ६ टक्केच राहिले. १९९८ मध्ये १ टक्के पुरुषांना फुफ्फुसाचा कॅन्सर होत होता, २०११ मध्ये हे प्रमाण वाढून ३ टक्के इतके झाले. तंबाखूमुळे मुत्राशयाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण १९९८ मध्ये ०.८ टक्के होते, ते वाढून २ टक्के झाले. तंबाखूमुळे कँन्सर झालेल्या पेशंटपैकी ३९ टक्के पेशंट मृत्युमुखी पडतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment