रिलायंस रिटेल मध्ये सौदीच्या पीआयएफची ९५५५ कोटींची गुंतवणूक

फोटो साभार स्टार्टअप न्यूज

मुकेश अंबानी यांच्या रिलायंस रिटेल मध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यासाठी रांगा लावून थांबलेले दिसत असतानाचा शुक्रवारी सौदीच्या पब्लिक इन्वेस्टमेंट फंडने २.०४ टक्के म्हणजे ९५५५ कोटींची गुंतवणूक केल्याची घोषणा केली आहे. रिलायंस रिटेल मध्ये ९ सप्टेंबरपासून गुंतवणुकीचा दौर सिल्व्हर लेक पासून सुरु झाला आणि त्यात आत्तापर्यंत केकेआर, जनरल अटलांटिक, मुबाडला, जीआयजी, टीपीजीटी व एडीआयए ग्रुपनी गुंतवणूक केली आहे.

पब्लिक इन्वेस्टमेंट फंडच्या या गुंतवणुकीमुळे रिलायंस रिटेल मध्ये १० टक्क्यापेक्षा जास्त इक्विटीसाठी ४७२६५ हजार कोटी गुंतविले गेले आहेत. पीआयएफच्या गुंतवणूकी संदर्भात बोलताना रिलायंस उद्योगाचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले, सौदी अरेबिया बरोबर आमचे दीर्घ काळ संबंध आहेत. पीआयएफने सौदीच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून रिलायंस रिटेल मध्ये झालेल्या गुंतवणुकीचे आम्ही स्वागत करतो.

१३० कोटी भारतीय आणि लाखो लहान मोठ्या व्यापाऱ्यांचे जीवन समृध्द करणे आणि रिटेल सेक्टर मध्ये बदल घडविणे या आमच्या महत्वाच्या योजनेत पीआयएफचे समर्थन कायम राहील अशी अपेक्षा मुकेश यांनी व्यक्त केली. रिलायंस रिटेल सध्या देशात १२ हजार स्टोर्स मधून वर्षाला ६४ कोटी ग्राहकांना सेवा देत आहे. हा त्याचा सर्वात मोठा वेगाने विकसित असलेला व्यवसाय असून रिलायंसने देशातील २ कोटी व्यापारी जोडण्याचे लक्ष्य ठेवले आहे.