एटीएमचा असा लागला शोध

shepherd
गरज ही शोधाची जननी असते हे आपल्या अॅटोमॅटिक टेलर मशीन म्हणजे एटीएम मशीनच्या शोधाबाबतही लागू आहे. बँकातून पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांगात उभे राहण्यापासून अखिल मानव जातीची सुटका करणार्‍या या एटीएम मशीनचा पहिला वापर लंडनमध्ये २७ जून १९६७ साली बार्कलेज बँकेत केला गेला आणि या यंत्राचा शोध लावणारा माणूस जॉन शेफर्ड बॅरन याचा जन्म भारतात झाला होता. बॅरन हा स्कॉटलंडचा रहिवासी होता. त्याचा जन्म २३ जून १९२५ साली मेघालयची राजधानी शिलाँग येथे झाला होता. बॅरन १५ मे २०१० रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी मरण पावला.

या मशीनचा शोध लावण्यासाठी अगदी किरकोळ घटना कारणीभूत ठरली. म्हणजे बॅरनला पैसे काढायचे होते पण बँकेत पोहोचपर्यंत त्याला १ मिनिटाचा उशीर झाला आणि बँक बंद झाली. तेव्हाच त्याच्या डोक्यात अशी कल्पना आली की चॉकलेट देणार्‍या व्हेंडींग मशीनप्रमाणे लोकांना चोवीस तास कधीही पैसे मिळू शकतील असे यंत्र तयार केले तर? नुसती कल्पना करून तो थांबला नाही तर त्याने खरेच असे यंत्र तयार कले.

प्रत्येक पुरूषाच्या यशामागे एक स्त्री असते हा नियम बॅरनलाही लागू होतो बरं का! बॅरनने पैसे देणारे मशीन तयार केले पण त्याचा पिन सहा आकडी ठेवावा असे त्याचे मत होते. येथे त्याच्या बायकोने मोडता घातला आणि सहा आकडे लक्षात ठेवणे अवघड बनेल असे सांगून पिन चार आकडीच ठेवावा असा सल्ला दिला आणि आजतागायत हा पिन चार आकडीच आहे.

वास्तविक १९६० साली एटीएम प्रमाणेच न्यूयॉर्क फर्स्ट नॅशनल सिटी बॅकेने म्हणजे आत्ताच्या सिटी बँकेने बॅकोग्राफ नावाचे मशीन तयार करून वापरता आणले होते. मात्र त्यातून पैसे काढता येत नसत. नागरिक लिफाफयात पैसे, नाणी, चेक ठेवून ते या मशीनमध्ये टाकून आपली बिले चुकती करू शकत. पहिले मशीन तयार झाले तेव्हा व्हाऊचर बँकेतून घेऊन पेमेंट करता येत असे.बॅरन ने तयार केलेल्या पहिल्या एटीएम मध्ये कार्डचा वापर केला. मात्र तेव्हाही प्रत्येकवेळी हे कार्ड बँकेकडून अगाऊ घ्यावे लागत असे कारण एक कार्ड एकदाच वापरता येई.

नंतर त्यात सुधारणा होत होत आत्ताचे एटीएम अस्तित्वात आले. भारतात पहिले एटीएम मुंबईत एचएसबीसी म्हणजे हाँगकाँग अॅन्ड शांघाय बँकींग कार्पोरेशनने आणले आणि आजघडीला भारतात एटीएमची संख्या २ लाख ३० हजार मशीन्सवर पोहोचली आहे.

Leave a Comment