अमेरिकन राष्ट्रपतींना मिळणारा पगार व अन्य भत्ते

अमेरिकेसारख्या महासत्तेचे राष्ट्रपती बनणे ही केवळ प्रतिष्ठेची बाब नाही कारण प्रतिष्ठेबरोबर या पदाचे लाभही फार मोठे आहेत. आजी माजी राष्ट्रपतींना अनेक लाभ व भत्ते मिळत असतात. ते कोणते याची माहिती आमच्या वाचकांसाठी

अमेरिकेच्या राष्ट्रपतींना दरवर्षी ४ लाख डॉलर्स म्हणजे २,९४,१९४४० रुपये पगार मिळतो शिवाय १९ हजार डॉलर्स मनोरंजन भत्ता, ५० हजार डॉलर्स व्यय भत्ता, १ लाख डॉलर्स करविरहित योग्य प्रवास भत्ता असे अन्य लाभ आहेत. शिवाय माजी राष्ट्रपतींना पेन्शन म्हणून २ लाख डॉलर्स तसेच राष्ट्रपतीच्या विधवेला १ लाख डॉलर्स दिले जातात. राष्ट्रपतींना पगाराशिवाय १७ प्रकारचे अन्य भत्ते दिले जातात.

निवासस्थान- १८०० सालानंतर अमेरिकन अध्यक्षांच्या निवासस्थानात अनेक बदल झाले आहेत. व्हाईट हाउस या सहा मजली इमारतीचे क्षेत्रफळ ५५ हजार चौरस फुट आहे. त्यात १३२ खोल्या, ३५ बाथरूम, २८ फायरप्लेस, १ टेनिस कोर्ट, बोलिंग अॅली, फॅमिली मुव्ही थियेटर, जॉगिंग ट्रॅक, स्वीमिंग पूल व पाच शेफ, सचिव, कॅलीग्राफर, फुलवाला, बटलर असा स्टाफ असतो.

ब्लेअर हाउस या गेस्टहाउसचे क्षेत्रफळ ७० हजार चौरस फुट असून त्यात ११९ खोल्या, गेस्ट कर्मचारी यांच्यासाठी २० बेडरूम्स, ३५ बाथरूम, ४ डायनिंग रुम्स, १ जिम, फुलवला, हेअरसलून अश्या सुविधा आहेत.

कॅप डेव्हिड हा १९३५ मध्ये स्थापना झालेला राष्ट्रीय पर्वत परिसर १२८ एकरचा आहे. तो मेरीलँड डोंगररांगा मध्ये आहे. प्रत्येक राष्ट्रपतीने या सुविधेचा वापर केला आहे. शिवाय राष्ट्रपतींच्यासाठी खास विमान असून एअरफोर्स वन नावाने ते ओळखले जाते. हे विमान अत्याधुनिक आणि सुरक्षेच्या दृष्टीने एखाद्या भक्कम किल्ल्याप्रमाणे आहे. मरिन वन ताफ्यात राष्ट्रपतीच्या हेलीकॉप्टरला पाच हेलिकॉप्टरची सोबत असते. या ताफ्याचे काम रेस्क्यू मिशन ऑपरेट करणे हे आहे. इंजिन फेल झाले तरी ताशी १५० मैल वेगाने ते क्रुझ संचालित करू शकते.

राष्ट्रपतीच्या तैनातीला ‘द बीस्ट’ ही खास लीमोसीन असून तिच्यावर कोणत्याही मिसाईल, रासायनिक अस्त्राचा परिणाम होत नाही. या कार मध्ये ऑक्सिजन पुरवठा, फायर फायटिंग सिस्टीम, रक्तपेढीची सुविधा आहे. राष्ट्रपती आणि त्यांच्या परिवाराला चोवीस तास सुरक्षा पुरविली जाते आणि हे काम सिक्रेट सर्विस विभागाच्या अखत्यारीत येते.