डे ऑफ डेड, रडण्याची स्पर्धा यंदा व्हर्चुअल

फोटो साभार भास्कर

उत्तर अमेरिकेतील मेक्सिको येथे दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या डे ऑफ डेड म्हणजे मृत व्यक्ती दिवस मध्ये यंदा रडण्याची स्पर्धा व्हर्चुअली घेतली गेली आणि त्यात कॅलिफोर्नियाची प्रिन्सेस कॅटलीना चावेज प्रथम आली. चावेज अभिनेत्री आहे. यंदा करोना मुळे ही स्पर्धा व्हर्चुअल झाली. त्यात दोन दोन मिनिटांचे रडण्याचे व्हिडीओ स्पर्धकांनी शेअर करायचे होते. त्यात दरवर्षीच्या दुप्पट संख्येने एन्ट्री आल्या. विजेत्या चावेजने पूर्वपरवानगी घेऊन एका अज्ञात कबरीजवळ रडत असल्याचा व्हिडीओ पाठविला होता.

डे ऑफ डेड या दिवशी मृताच्या कबरीवर त्याला आवडणाऱ्या वस्तू, फुले ठेऊन सजावट केली जाते. त्यावेळी कबरीजवळ शोक केला जातो. हा उत्सव येथे सार्वजनिक स्वरुपात साजरा होतो आणि मेक्सिको मध्ये मृत्यू नंतर रडणेच नाही तर हसणेही संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती मिळते असे मानले जाते. यंदा करोना मुळे कबरस्ताने बंद राहिली. त्यामुळे लोकांना या सार्वजनिक उत्सवात रडण्याची संधीच मिळाली नव्हती. दरवर्षी रडण्याच्या स्पर्धेत लाईव्ह पर्फोर्मंस द्यावा लागतो पण यंदा एकत्र येण्यास बंदी असल्याने व्हर्चुअल स्पर्धा घेतली गेली.

या वेळी स्पर्धकांनी रडण्याचे अनेक प्रकार दाखविले. काही जणांचे रडणे अति नाटकी होते. काही जणांनी चक्क टाहो फोडला होता पण अभिनेत्री चावेज हिने मात्र संयमित रडण्याचे कौशल्य दाखविले. स्पर्धेत सर्वाधिक रडणाऱ्याची निवड करण्याची प्राचीन परंपरा मेक्सिको मध्ये आहे.