अनोखे अद्भूत सेल्फी म्युझियम

musium
फिलिपिन्सची राजधानी मनीला सेल्फी कॅपिटल ऑफ वर्ल्ड म्हणून नव्याने उदयास आली असून येथे उभारण्यात आलेले अनोखे, अद्भूत सेल्फी म्युझियम अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय झाले आहे. याचे कारण म्हणजे येथील पेटींग्ज, स्कल्प्चर्स वा अन्य वस्तूंना तुम्हाला हात लावण्याची, त्यांच्यावर चढण्याची आणि त्यांचे फोटो काढण्याची पूर्ण परवानगी आहे. इतकेच नव्हे तुम्ही सेल्फी काढली नाही तरच येथे नाराजी व्यक्त केली जाते. या संग्रहालयात जगातील नामवंत कलाकृतींच्या थ्रीडी प्रतिकृती आहेत.

जगातील नामवंत संग्रहालये प्रेक्षकांना भरपूर आनंद आणि समाधान देत असतात मात्र तेथे तुमच्यावर अनेक बंधनेही असतात. येथे फोटो काढण्यास सक्त मनाई असते आणि संग्रहालयातील कलाकृती कांही अंतर ठेवूनच तुम्हाला पहाव्या लागतात. मनिलातील आयलंड म्युझियम म्हणूनच वेगळे ठरते आहे. या संग्रहालयात १० झोन असून त्यांचे वर्गीकरण फँटसी, रिलीजन, प्राणीजगत अशा विविध भागात करण्यात आले आहे. येथे तुम्ही या कलाकृतींचे फोटो, व्हीडीओ घेऊ शकता, त्यांना स्पर्श करू शकता यामुळे हे संग्रहालय पाहणे फारच मौजेचे ठरते असा पर्यटकांचा अनुभव आहे.

या संग्रहालयात येताना एक बंधन मात्र पाळावे लागते ते म्हणजे येथे बूट चप्पल घालून आत जाता येत नाही. याचे कारण म्हणजे पादत्राणांमुळे येथील कलाकृतींवर डाग पडणे अथवा उंच टाचाचे ठप्पे उठणे या सारखे प्रकार होऊ नयेत म्हणून.

Leave a Comment